गडचिरोली : महात्मा गांधी जयंतीपासून सुरू झालेली स्वच्छता मोहीम शाळांनी विविध उपक्रमांच्या माध्यमातून चालूच ठेवली आहे. त्यामुळे गाव नीटनेटके होण्यास मदत होत आहे. जांभळी येथील सिंधूताई पोरेड्डीवार हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय गोगाव- येथील विद्यार्थ्यांनी मंगळवारी गोगाव येथे स्वच्छता मोहीम राबविली. विद्यार्थ्यांनी स्वत: हातात झाडू धरून गावातील मुख्य चौकाची साफसफाई केली व गावकऱ्यांना स्वच्छता पाळण्याविषयी आवाहन केले. विद्यार्थ्यांनी साफसफाईला सुरूवात केल्यानंतर गावातील महिलांनीही त्यांना मदत करत साफसफाई केली. विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे गावकऱ्यांनी कौतुक केले आहे.ही मोहीम प्राचार्य कविता पोरेड्डीवार यांच्या मार्गदर्शनात प्रा. मुनघाटे, कढव, बैस, बोमनवार, तावाडे, बारसागडे, मलोडे मांदाडे, पिल्लेवान यांनी राबविली. जय पेरसापेन विद्यालय जांभळी- येथील विद्यार्थ्यांनी स्वच्छतेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी गावातून रॅली काढली. रॅलीमध्ये ग्रामपंचायत पदाधिकारी, जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक, विद्यार्थी व गावकऱ्यांनी सहभाग घेतला होता. रॅलीनंतर विद्यार्थ्यांना स्वच्छतेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी विद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामदास दाजगाये होते. आरोग्य सुदृढ राहण्यासाठी प्रत्येकाने घर व परिसरात स्वच्छता राखावी, प्लास्टीकचे अनेक वर्ष होत नसल्यामुळे प्लास्टीकच्या कचऱ्याची फार मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी प्लास्टीकचा वापर मर्यादित प्रमाणात करावा, असे आवाहन केले. संचालन अवथरे तर आभार खांडरे यांनी मानले. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खामतळा- येथील विद्यार्थ्यांनी स्वच्छतेविषयी गावातून प्रभातफेरी काढली. प्रभातफेरीदरम्यान स्वच्छ भारत व स्वच्छ शाळा व घोषवाक्यांच्या सहाय्याने नागरिकांना स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक पी. एम. जनबंधू होते. प्रमुख अतिथी म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश मडावी, हेमराज सहारे, चावरे, मेश्राम, ठाकरे, सिडाम आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी राबविली स्वच्छता मोहीम
By admin | Updated: October 16, 2014 23:25 IST