सिरोंचा : सिरोंचा तालुक्यात नेहमी वीज पुरवठा खंडित होत असून कधीकधी दोन ते तीन दिवस वीज पुरवठा पूर्णत: ठप्प असतो. या समस्येमुळे शेतकरी व सामान्य जनता त्रस्त झाली आहे. विजेची समस्या दूर करण्यासाठी टॉवर लाईन शिवाय पर्याय नाही. त्यामुळे सिरोंचा येथे १३२ केव्हीचे नवे वीज उपकेंद्र उभारण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
सिरोंचा तालुक्याला ज्या विद्युत लाईनने पुरवठा केला जातो, ती विद्युत लाईन जंगलातून येते. पाऊस, वादळ झाल्यानंतर एखादे खांब कोसळते व वीज पुरवठा खंडित होतो. आलापल्ली ते सिरोंचादरम्यानचे अंतर शेकडो किमी आहे. वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण टाळण्यासाठी या ठिकाणी १३२ केव्हींचे वीज उपकेंद्र आवश्यक आहे. तसेच मुख्य लाईन सुद्धा टॉवरच्या खांबांची असणे आवश्यक आहे. टॉवरलाईन असल्यास झाड कोसळण्याची शक्यता कमी होते. त्यामुळे टॉवर लाईनची गरज आहे.
जंगलातून टॉवर लाईनने वीज पुरवठा झाल्यास बिघाड कमी होणार असल्याने दुरुस्तीवर होणारा खर्च कमी होण्यास मदत होईल. यामुळे महावितरणच्याच पैशाची बचत होण्यास मदत होईल.