लोकमत न्यूज नेटवर्क एटापल्ली : तालुक्यात कार्यरत विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी न राहता नक्षल भत्ता घेतात. मुख्यालयी न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना सदर भत्ता देऊ नये, तसेच क्रीडा संमेलन दरम्यान मद्यधुंद आढळलेल्या शिक्षकांना निलंबित करावे, अशा सूचना आ. धर्मरावबाबा आत्राम यांनी मंगळवारी एटापल्ली पंचायत समितीच्या आमसभेत अधिकाऱ्यांना दिले.
आमसभेला तहसीलदार हेमंत गांगुर्डे, गटविकास अधिकारी डॉ. आदिनाथ आंधळे, अहेरी पंचायत समितीचे माजी सदस्य हर्षवर्धन आत्राम, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय चरडुके, पंचायत समितीचे माजी सदस्य जर्नादन नल्लावार, प्रसाद राजकोंडावार, पौर्णिमा श्रीरामवार, नसरू शेख, मनीष दुर्गे व अन्य अधिकारी, उपस्थित होते. पाणी, रस्ते, वीज, वनपट्टे, रेशनकार्ड, बससेवा, घरकुल करिता वाळू अशा अनेक मुद्द्यांवर नागरिकांनी तक्रारी केल्या. अधिकाऱ्यांनी गावातील विकासाकडे लक्ष द्यावे. निर्धारित वेळेत कामे करावी असे निर्देश दिले.
दरम्यान, आमसभेत अनेक नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या. तसेच घरकूल लाभार्थ्यांना कार्यारंभ आदेश तसेच बांधकाम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र आ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते देण्यात आले.
वनविभागाने अडवणूक करू नये
- मद्यपी शिक्षकांवर शिक्षण विभागाकडून अजूनपर्यंत काहीही कारवाई झाली नाही. या बाबीची लवकर चौकशी करावी.
- आमसभेला अनुपस्थित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, असे निर्देश दिले. वनविभागाकडून विकास कामांना अडवणूक होऊ नये, अशा सूचनाही त्यांनी केल्या.