तालुक्यातील कोणत्याही नागरिकाला ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी, अतिसार ही लक्षणे दिसल्यास आजार अंगावर न काढता तत्काळ जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा सरकारी रुग्णालयात जाऊन काेराेना चाचणी करून घ्यावी. आजाराला न घाबरता वेळीच चाचणी करून वेळेत उपचार केल्यास हा आजार लवकर बरा होतो.
गावामध्ये कोणालाही वरील आजाराची लक्षणे आढळल्यास याची माहिती तत्काळ आरोग्य विभागास द्यावी. त्याची चाचणी करून त्याला विलगीकरणात ठेवावे. गावात फिरू देऊ नये, तसेच इतरांनी त्याच्या संपर्कात येऊ नये. नागरिकांनी एकत्र येऊन गर्दी करू नये, कोणत्याही धार्मिक तसेच लग्नकार्यात २५ पेक्षा अधिक लोकांनी सहभागी होऊ नये, तसेच सर्वांनी नेहमी मास्कचा वापर करावा, वारंवार हात धुवावे व शारीरिक अंतर ठेवावे, विनाकारण घराबाहेर पडू नये, तसेच दररोज पिण्यासाठी गरम पाण्याचा वापर करावा. सात्विक अन्न घ्यावे. दारू, तंबाखू व खर्ऱ्याचे सेवन करू नये. ४५ वर्षांवरील व्यक्तींनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घ्यावी. लसीचे कोणतेही दुष्परिणाम हाेत नाही, त्यामुळे कोणत्याही अफवांना बळी पडू नये, असे आवाहन कोरचीचे तहसीलदार सी.आर.भंडारी यांनी केले आहे.