लाेकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : पोलीस मदत केंद्र पोटेगाव हद्दीतील कुनघाडा रै. वनपरिक्षेत्रात भरधाव दुचाकीने चितळाला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार व चितळ ठार झाले. यात दुचाकीवरील युवती जखमी झाली. सुनील मनकू कडयामी (वय ३३) रा. भेंडीकन्हार असे मृत इसमाचे नाव आहे, तर काजल भीमराव पोटावी (२२) रा. मालेरमाल असे जखमी युवतीचे नाव आहे. हा अपघात दि.२४ च्या संध्याकाळी ७.३० वाजताच्या सुमारास भेंडीकन्हार दुधवाईजवळ घडला.प्राप्त माहितीनुसार, मृत सुनील मनकू कडयामी यांची भाची काजल भीमराव पोटावी ही कार्यक्रमानिमित्त भेंडीकन्हार येथे मामाकडे आली होती. कार्यक्रम पार पडल्यानंतर मृतक सुनील कडयामी हे भाचीला तिच्या गावी पोहोचविण्यासाठी गिलगावमार्गे दुचाकीने (एमएच ३३, वाय ९२५८) निघाले होते. वनपरिक्षेत्र कुनघाडा रै, गिलगाव नियत क्षेत्रातील कक्ष क्रमांक १०९ मधील दुधवाई जंगल परिसरातून जात असताना गिलगाव-पोटेगाव मुख्य मार्गावर एक चितळ अचानक आडवा आला. त्यामुळे दुचाकीची चितळाला जोरदार धडक बसली.या धडकेत चितळ जागीच ठार झाला. सोबत दुचाकीस्वार खाली कोसळल्याने सुनील कडयामी यांचा उपचारादरम्यान गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला, जखमी युवती काजल पोटावी हिच्यावर उपचार सुरू आहेत.
मृत चितळाचे दहनदुचाकीच्या धडकेत चितळ ठार झाल्याचे कळताच वनपरिक्षेत्र अधिकारी महेशकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्र सहायक एस. एम. मडावी यांच्या चमूने घटनास्थळ गाठून मृत चितळास ताब्यात घेतले. गिलगाव येथील पशुधन विकास अधिकारी गोंगल व सहायक चौधरी यांनी चितळाचे शवविच्छेदन केले असता दुचाकीची धडक बसल्यामुळे श्वास रोखून चितळाचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे ते मादी चितळ गरोदर अवस्थेत होते. सर्व चौकशीअंती मृत चितळाचे कुनघाडा रै वनपरिक्षेत्रात दहन करण्यात आले. यावेळी वनरक्षक देवेंद्र वासेकर, वनरक्षक कौशल्या मडावी, वनरक्षक आय. आर. भेंडेकर व इतर वन कर्मचारी हजर होते.
पाण्याच्या शोधात वन्यप्राणी बाहेर- अन्न व पाण्याच्या शोधात वन्यप्राणी रात्रीच्या वेळी बाहेर पडत असतात. मुख्यतः रस्त्यावर येत असतात. त्यामुळे जंगली भागात रस्त्याने वाहन चालवताना दक्षता घ्यावी, समोरचा धोका टाळण्यासाठी वाहने हळू चालवावी आणि स्वत:सोबत वन्यप्राण्यांचे संरक्षण करावे, असे आवाहन वनपरिक्षेत्राधिकारी महेशकुमार शिंदे व क्षेत्र सहायक एस. एम. मडावी यांनी केले.