१३६ जागा रिक्त : तीन ते सहा वयोगटातील बालकांची होत आहे कुचंबणागडचिरोली : लहान बालकांचे संस्कार मंदिर मानल्या जाणाऱ्या अंगणवाडींनाही रिक्त पदांचे ग्रहण लागले असून जिल्हाभरातील शेकडो अंगणवाडीत अंगणवाडी सेविका व मदतनिसाचे एकूण १३६ पदे रिक्त आहेत. बहुतांश अंगणवाडीचा कारभार प्रभारी अंगणवाडी सेविकेच्या भरवशावर सुरू असल्याने तीन ते सहा वयोगटातील अंगणवाडीत दाखल बालकांची कुचंबणा होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.अंगणवाडीच्या माध्यमातून लहान बालकांवर चांगले संस्कार करण्याबरोबरच त्यांच्या आरोग्याचीही काळजी घेतल्या जाते. लहान बालक व गरोदर माताना पोषण आहार उपलब्ध करून दिल्या जाते. त्याचबरोबर गरोदर माताना आरोग्यविषयक मार्गदर्शनही करण्याची महत्त्वाची जबाबदारी अंगणवाडी सेविका व मदतनीस पार पाडतात. शासनाने गाव तिथे अंगणवाडी व काही मोठ्या गावांमध्ये दोन ते तीन अंगणवाड्या स्थापन केल्या आहेत. गडचिरोली जिल्ह्यात एकूण १ हजार ७७१ अंगणवाड्या व ५१८ मिनी अंगणवाड्या आहेत. अंगणवाडीमध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस कार्यरत राहतात. १७१ अंगणवाड्यांपैकी ३६ अंगणवाडी सेविका व ५५ अंगणवाडी मदतनिसांची पदे रिक्त आहेत. ज्या अंगणवाडीमध्ये अंगणवाडी सेविकेचे पदे रिक्त आहे. त्या अंगणवाडीत जवळपासच्या गावातील अंगणवाडी सेविकेवर सोपविण्यात आला आहे. मात्र स्वत:ची अंगणवाडी सांभाळून दुसऱ्या गावाची अंगणवाडी सांभाळताना अंगणवाडी सेविकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. बऱ्याचवेळा लहान बालकांकडे दुर्लक्ष होत आहे. ज्या अंगणवाडीत मदतनिसाचे पद रिक्त आहे, तेथील अंगणवाडी सेविकेलाच मदतनिसाचे काम करावे लागत आहे. मिनी अंगणवाडीमध्ये केवळ अंगणवाडी सेविका राहते. त्यामुळे रिक्त पदांचा प्रभार गावातीलच अंगणवाडी सेविकेवर सोपविला जात आहे. अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या रिक्त पदांचा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून भेडसावत आहे. लहान बालक व गरोदर मातांच्या आरोग्याची काळजी घेण्याची महत्त्वाची जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर असल्याने सदर पदे भरण्यात यावी, अशी मागणी होत आहे. (नगर प्रतिनिधी)
अंगणवाडीचा कारभारही प्रभारींवरच
By admin | Updated: June 11, 2015 01:51 IST