लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्हावासीयांवर कोरोनाचे सावट आले असताना अजूनही ग्रामीण व दुर्गम भागातील अनेक नागरिकांचे लसीकरण झाले नाही. त्यामुळे ३ ते १५ जानेवारीदरम्यान लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवून आखलेल्या कार्यक्रमाची तपासणी करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दक्षिण गडचिरोली भागातील बहुतांश तालुक्यांना भेटी देऊन लसीकरणाचा आढावा घेतला. आरोग्य यंत्रणेसह गावातील प्रमुख घटकांची एकत्रित सभा घेऊन त्यांना मार्गदर्शन केले. सीईओ आशीर्वाद यांनी सलग ५ दिवस अहेरी, भामरागड, एटापल्ली, धानोरा, चामोर्शी, सिरोंचा व कोरची तालुक्यात लसीकरणासंबंधी सभा घेतल्या. या सभेला आरोग्य यंत्रणेतील अधिकारी-कर्मचारी, तलाठी, कोतवाल, पोलीस पाटील, ग्रामसेवक आदी प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांच्याकडे तालुक्यातील १०० टक्के लसीकरण करण्याची जबाबदारी निश्चित करण्यात आली.कुमार आशीर्वाद यांच्या भेटी व सभेदरम्यान एटापल्ली व भामरागड तालुक्याचे उपविभागीय अधिकारी शुभम गुप्ता, धानोरा व गडचिरोलीचे उपविभागीय अधिकारी आशिष येरेकर, अहेरी व सिरोंचा तालुक्याचे उपविभागीय अधिकारी श्री अंकित, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विनोद म्हशाखेत्री आदींसह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.नव्याने येत असलेल्या लाटेमुळे लसीकरणाचा वेग वाढविण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची तयारीजानेवारीअखेरपर्यंत जिल्ह्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याने त्यादृष्टीने प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. याआधीच्या दोन लाटांदरम्यान जिल्ह्यात लसीकरण पुरेशा प्रमाणात न झाल्याने कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढले होते. याशिवाय जीवित हानीही झाली. त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी १०० टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.