आरमाेरी : नुकसानग्रस्त पिकाची पाहणी करण्यासाठी गडचिराेली जिल्ह्यात दाखल झालेल्या केंद्रीय पथकाने शुक्रवारी दुपारच्या सुमारास आरमाेरी-गडचिराेली मार्गावरील देऊळगावनजीकच्या रस्त्यालगत असलेल्या शेतीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. जवळपास १५ मिनीटाच्या भेटीत केंद्रीय पथकाने खाेब्रागडी नदीलगत शेताची पाहणी केली. यावेळी देऊळगाव येथील शेतकरी प्रकाश ठाकरे व इतर शेतकऱ्यांशी संवाद साधला. ऑगस्ट महिन्यात आलेल्या महापुराने धानपीक बुडाले. नुकसान हाेऊनही शासनाकडून भरीव मदत मिळाली नाही, असे सांगत शेतकऱ्यांनी बॅंकेचे पासबुक पथकातील अधिकाऱ्यांना दाखविले.
महापुराने ऑगस्ट महिन्यात धान पीक बुडाले तर त्याची कापणी केली काय, असा प्रश्न पथकाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना विचारले. नाेव्हेंबरमध्ये कापणी केल्याचे एका शेतकऱ्यांनी सांगितले. तेव्हा ऑगस्टमध्ये धान बुडाल्यानंतर कापणी कशी केली, असा प्रश्न पथकाच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित केला. धानपीक गेले परंतु जनावरांना चारा व्हावा, यासाठी नाेव्हेंबर महिन्यात कापणी केल्याची माहिती शेतकऱ्यांनी पथकाला दिली. मागील वर्षी धानाचे किती उत्पादन झाले व यावर्षी किती उत्पादन झाले, असा प्रश्न अधिकाऱ्यांनी विचारला. मागील वर्षी सव्वा एकरात २५ पाेते धान झाले. मात्र या वर्षी दाेन ते तीन पाेते हाती लागले, असे शेतकऱ्यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या मागणीवर नुकसानग्रस्तांना मदत मिळेल, असे पथकाच्या अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले. याप्रसंगी जिल्हाधिकारी दीपक सिंगला, उपविभागीय अधिकारी विशाल मेश्राम, तहसीलदार कल्याणकुमार डहाट यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित हाेते.