कार्यशाळा : कृषी तज्ज्ञांनी दिली शेतकऱ्यांना माहितीगडचिरोली : कृषी विज्ञान केंद्र सोनापूरच्या वतीने शुक्रवारी गडचिरोली जिल्ह्यातील पिकांवरील कीड व रोग व्यवस्थापन या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेदरम्यान कृषी कर्मचाऱ्यांना रोगनियंत्रणाबाबत तांत्रिक मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेचे उद्घाटन कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. एस. पी. लांबे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी उपविभागीय कृषी अधिकारी एम. के. सोनटक्के, कृषी अधीक्षक कार्यालयाचे अधिकारी चंद्रकांत ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यशाळेदरम्यान गडचिरोली, धानोरा, चामोर्शी तसेच मुलचेरा तालुक्यातील कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी उपस्थित होते. त्यांना कीड रोग, मित्र कीडीची ओळख व त्यावरील उपाययोजना याबाबत माहिती देण्यात आली. अध्यक्षीय भाषणात डॉ. एस. के. लांबे यांनी कीड व रोगांची ओळख असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. रोगाची ओळख झाल्यानंतर त्यावर बिनचूक उपाययोजनेची अंमलबजावणी करून कीड रोग नियंत्रणात आणणे शक्य होत असल्याचे प्रतिपादन केले. डॉ. सुधीर बोरकर यांनी धानाच्या सर्वच जातींवर कीडी व रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कृषी कर्मचाऱ्यांनी गावात सभा घेऊन योग्य मार्गदर्शन करावे. पंचायत समितीच्या मार्फतीने अनुदानावर कीटकनाशके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. याबाबतची माहिती देण्याचे आवाहन केले.कार्यशाळेत ४५ अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. यशस्वीतेसाठी जितेंद्र कस्तुरे यांच्यासह कृषी विज्ञान केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)
कृषी विज्ञान केंद्राने केले कीड, रोगांवर मार्गदर्शन
By admin | Updated: September 26, 2015 01:26 IST