लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : उन्हाळ्याच्या तीव्रतेत वाढ झाल्यामुळे विजेच्या उपकरणांजवळ कचरा जाळल्यास धोका निर्माण होऊ शकतो. वीज वाहिन्या, वितरण रोहित्र, फीडर पीलर किंवा वितरण पेट्यांजवळ कचरा जाळण्याच्या प्रकारामुळे वीज यंत्रणेला धोका निर्माण होऊन सर्वसामान्य नागरिकांसोबतच वीज वितरण कंपनीला नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे वीज यंत्रणेजवळ कचरा टाकू नये आणि त्यास जाळूही नये, असे आवाहन महावितरणने केले आहे.
शहरी व ग्रामीण भागात अनेक ठिकाणी वीजवाहिन्या, फिडर पिलर, वितरण रोहित्र, वितरण पेटी किंवा डी.पी. अशा वीज यंत्रणेजवळील उघड्यावर असलेल्या जागेत कचरा टाकण्यात येतो. वीज यंत्रणेजवळ साठवलेला हा कचरा पेटविल्याने किंवा इतर कारणामुळे कचरा जळाल्याने विजेच्या भूमिगत केबल व इतर वीज यंत्रणा आगीमुळे नादुरुस्त झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पर्यायाने संबंधित परिसरातील वीजपुरवठाही खंडित झालेला आहे. दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत असल्याने कचन्यास आग लागण्याचे प्रकार वाढत आहेत. याबाबत स्थानिक ग्राम पंचायत व नगर पालिका प्रशासनाने जनजागृती करण्याचीही आवश्यकता आहे.
नागरिकांनो, आग लागल्यास येथे करा संपर्कनागरिकांनी उघड्यावर असलेल्या वीज यंत्रणेला धोका निर्माण होईल अशा ठिकाणी कचरा टाकू नये किंवा साठवलेला कचरा जाळू नये. अशा घटनांतून वीज यंत्रणेला आग लागल्यास १९१२ किंवा १९१२०, १८००-२१२-३४३५ आणि १८००-२३३-३४३५ या टोल फ्री क्रमांकांवर किंवा नजीकच्या महावितरण कार्यालयाला त्याची सूचना देण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
तर होणार वीज खंडितवीज यंत्रणा उन्हामुळे तापलेली असल्याने अशातच अशा आगीमुळे वीज वितरण यंत्रणेचे तापमान वाढल्यास यंत्रणेला त्याचा फटका बसतो. उपरी वीजवाहिन्याखाली असलेल्या कचऱ्याचा ढिग पेटल्यामुळे किंवा त्याला आग लागल्यामुळे वीजतारा वितळून वीज खंडित होण्याचा धोका अधिक आहे.
शॉर्ट सर्किटतून अपघात
- घरगुती विद्युत उपकरणे आणि दिवे अति गरम झाल्याने शॉर्ट सर्किटचा धोका होऊन आग लागण्याचीही शक्यता असते. घरगुती वायरिंग किंवा नादुरुस्त स्विचेस आणि उपकरणांमुळेही शॉर्ट सर्किट होण्याची शक्यता आहे.
- वायरिंगमध्ये कित्येक वेळी सैल जोड वा कनेक्शन असतात, कालांतराने हे जोड कार्बनाइज होतात. कधी कधी हे जोड सैल असल्यामुळे व त्याला घट्ट इन्सुलेशन न केल्यामुळे उंदीर, पाल आदी या वायर कुरतडतात व हळूहळू त्यामुळे स्पार्किंग सुरू होते व प्रसंगी शॉर्ट सर्किट होऊन आग लागण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी दक्ष राहणे गरजेचे आहे.