स्थिती गंभीर : गडचिरोली शहराच्या विवेकानंद नगरातील घटना गडचिरोली : नवऱ्याला दारू सोडण्याची धमकी देण्यासाठी २२ वर्षीय महिलेने स्वत:च्या अंगावर रॉकेल टाकून जाळून घेतले. यामध्ये ती ६० टक्के जळाली. सदर घटना गडचिरोली शहरातील विवेकानंदनगर येथे शनिवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली. पायल गणेश सहारे असे जळून जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. तिचा पती गणेश राम सहारे हा नेहमी दारू पिऊन भांडण करीत असल्याने पायल त्रस्त झाली होती. शनिवारी सकाळी पायल व गणेश या दोघांमध्ये दारू वरून भांडण झाले. यादरम्यान राग अनावर झाल्याने त्याचबरोबर गणेशला दारू सोडावी यासाठी त्याला समजाविण्याकरिता पायलने स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून आग लावून घेतली. यामध्ये ती ६० टक्के जळाली. तिला वाचविण्याच्या प्रयत्नात गणेश सहारे हा सुध्दा किरकोळ प्रमाणात भाजला आहे. दोघांनाही गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात भरती करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याबाबतची फिर्याद पायल सहारेच्यावतीने पीएसआय संदीप पाटील यांनी पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली आहे व स्वत:च जाळून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याबद्दल पायलच्या विरोधात कलम ३०९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. (नगर प्रतिनिधी)
रॉकेल ओतून महिलेने जाळून घेतले
By admin | Updated: August 14, 2016 01:26 IST