लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा :बीएसएनएलचे नेटवर्क जुने असल्याने संपूर्ण तालुक्यात पसरले आहे, परंतु तीन दिवसांपासून बीएसएनएलचे नेटवर्क तांत्रिक कारणामुळे ठप्प पडले आहे. त्यामुळे तालुक्यातील बीएसएनएलच्या ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. बीएसएनएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन सेवा तत्काळ सुरळीत करावी, अशी मागणी होत आहे.
बीएसएनएलची सेवा ग्राहकांना रिचार्जसाठी परवडणारी असल्याने तालुक्यात हजारो नागरिक बीएसएनएल सेवेचा वापर करीत आहेत. तसेच परंतु गुरुवारी संपूर्ण दिवसभर नेटवर्क ठप्प असल्याने बँकेचे काम ठप्प पडले होते. शुक्रवारी नेटवर्क सुरळीत झाले परत शनिवार व रविवारी नेटवर्क ठप्प झाल्याने बीएसएनएलच्या ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
केबल तुटल्याने सेवा खंडितयाबाबत अधिक माहिती घेतली असता धानोरा - गडचिरोली राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असल्याने सातगाव येथे खोदकाम करताना केबल तुटल्याने बीएसएनएल नेटवर्क तालुक्यात ठप्प पडले असल्याची माहिती मिळाली.
रविवारी तीन वाजेपर्यंत नेटवर्क सुरळीत झाले नव्हते तरी बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन तालुक्यातील बीएसएनएल नेटवर्क सुरळीत करावे, अशी मागणी ग्राहकाकडून करण्यात येत आहे. येत्या आठ दिवसांत सेवेत सुधारणा न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला.