पायाभूत चाचणी : ४२ पैकी एकही शाळा ‘अ’ श्रेणीत नाहीगडचिरोली : ९ व १० आॅगस्ट रोजी घेण्यात आलेल्या दुसरी ते आठव्या वर्गाच्या भाषा व गणित विषयाच्या पायाभूत चाचणीमध्ये शासकीय आश्रमशाळांपैकी एकही आश्रमशाळेचा निकाल ‘अ’ श्रेणीत नाही. त्यामुळे या चाचणीच्या माध्यमातून आश्रमशाळेतील स्थिती उघड होण्यास फार मोठी मदत झाली आहे. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमांतर्गत मागील दोन वर्षांपासून राज्य शासनाच्या वतीने विविध उपक्रम राबविले जात आहेत. याच उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांची पायाभूत चाचणी वर्षातून तीनवेळा घेण्याची तरतूद आहे. त्यानुसार जिल्हाभरात ९ व १० आॅगस्ट रोजी पायाभूत चाचणी घेण्यात आली. यामध्ये ८१ ते १०० गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘अ’ श्रेणी, ६१ ते ८० गुण प्राप्त करणाऱ्यांना ‘ब’ श्रेणी, ४१ ते ६० गुण प्राप्त करणाऱ्यांना ‘क’ श्रेणी व ४० पेक्षा कमी गुण प्राप्त करणाऱ्यांना ‘ड’ श्रेणी दिली जाते. जिल्हाभरात एकूण ४२ आश्रमशाळा आहेत. त्यामध्ये ९ हजार ३०४ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र ४२ शाळांपैकी भाषा विषयात एकही शाळा ‘अ’ श्रेणीत नाही. गणित विषयात अहेरी तालुक्यातील केवळ एक शाळा आहे. उर्वरित शाळा ‘ब’ व ‘क’ श्रेणीतच असल्याचे आढळून येते. ब श्रेणीतील विद्यार्थ्यांना सर्वसाधारण समजले जाते. तर ‘क’ व ‘ड’ श्रेणी प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना अप्रगत मानले जाते. भाषा विषयात सुमारे २२ शाळा ‘क’ श्रेणीत आहेत. तर गणित विषयात सुमारे १७ शाळा क श्रेणीत आहेत. याचाच अर्थ या सर्व शाळा अप्रगत आहेत. येथील शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी आगाऊ वर्ग घ्यावे लागणार आहे. त्याचबरोबर यानंतर या सर्व शाळांवर शिक्षण विभागाचे विशेष लक्ष राहणार आहे.
चाचणीत आश्रमशाळांचे पितळ उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2016 01:34 IST