गुन्हे दाखल होण्याची शक्यता : बीड व नांदेडमधील शिक्षकांवर झाली कारवाईगडचिरोली : गडचिरोली पोलिसांनी बोगस बदली प्रकरणातील नस्त्या नसलेल्या ७३ शिक्षकांची पुन्हा चौकशी सुरू केली आहे. नस्ती गहाळ प्रकरणी याच शिक्षकांवर गुन्हे दाखल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गडचिरोली जिल्ह्यातील बोगस शिक्षक बदली सारखेच प्रकरण बीड व नांदेड जिल्ह्यातही २०१५ मध्ये उघडकीस आले होते. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी बीड जिल्हा परिषदेतील ५४ शिक्षकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. नांदेड जिल्ह्यातही ४४ शिक्षकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. त्याच धर्तीवर गडचिरोली जिल्ह्यात सुद्धा ७३ शिक्षकांवर गुन्हे दाखल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे शिक्षकांमध्ये प्रचंड खळबळ माजली आहे. मागील तीन महिन्यांपासून या ७३ शिक्षकांची पुन्हा चौकशी करणे सुरू झाले आहे. बोगस बदल्यांचे आदेश शिक्षण विभागाकडून तयार करण्यात आले नाही. त्यामुळे सदर आदेश नेमके कुणाकडून प्राप्त झाले, सदर आदेश प्राप्त करण्यासाठी काही आर्थिक व्यवहार झाले आहेत काय, या विषयीची माहिती पोलीस वेळोवेळी शिक्षकांना विचारत आहेत. मात्र शिक्षक सदर माहिती देण्यास तयार नाही. अशा प्रकारची माहिती देऊ नये, यासाठी बदली प्रकरणातील म्होरके व राजकीय पदाधिकारी शिक्षकांवर दबाव टाकत असल्याची माहिती आहे. त्यामुळे बीड व नांदेड जिल्ह्याप्रमाणेच गडचिरोली जिल्ह्यातही संबंधित ७३ शिक्षकांवरच गुन्हे दाखल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे नस्ती नसलेल्या या ७३ शिक्षकांमध्ये प्रचंड खळबळ माजली आहे. (नगर प्रतिनिधी)
बोगस बदली शिक्षक पोलिसांच्या रडारावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2016 01:21 IST