विसोरा : देसाईगंज तालुक्यातील शंकरपूर या गावापासून कुरखेडा मार्गावर उजव्या बाजूला असलेल्या शंकरपूर उपवनक्षेत्रातील बोडीत शिकार्यांनी शिकारीसाठी खड्डे खोदलेले असल्याने वन्यप्राण्यांचे जीव धोक्यात आले आहे.शंकरपूर गावापासून कुरखेडा मार्गावर अगदी जंगलात चोरमारी बोडी आहे. या बोडीत थोडेसे पाणी शिल्लक आहे. बोडीच्या सभोवताल शंकरपूर उपवनक्षेत्र असल्याने जंगलातील हरीण, चितळ, सांबर, डुक्कर, कोल्हे आदी वन्यप्राणी पाणी पिण्यासाठी या बोडीवर येतात. उन्हाची दाहकता अधिकच तीव्र झाल्याने व जंगल परिसरात हा एकच पाणवठा असल्याने हे वन्यप्राणी या तलावावर पाणी पिण्यासाठी येतात. या सर्व बाबींचा अभ्यास करुन परिसरातीलच शिकार्यांनी या वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी बोडीतील पाण्याच्या काठावर गोलाकार खड्डे खोदलेले आहेत. हरीण, चितळ, सांबर हे वन्यप्राणी कळपाने पाण्याच्या काठावर येताच खोदलेल्या खड्यामध्ये दबा धरुन बसलेले शिकारी प्राण्यावर वार करुन त्यांना ठार करतात. याबाबत वनविभाग अनभिज्ञ आहे. (वार्ताहर)
प्राण्यांच्या शिकारीसाठी बोडीत खोदले खड्डे
By admin | Updated: June 4, 2014 23:45 IST