जोरदार नारेबाजी : पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला काँग्रेस खासदारांचा निषेधगडचिरोली : पावसाळी अधिवेशनादरम्यान संसदेचे कामकाज बंद पाडणाऱ्या काँग्रेस खासदारांविरोधात रविवारी भाजप कार्यकर्त्यांनी येथील इंदिरा गांधी चौकात निदर्शने करुन निषेध नोंदविला.खा. अशोक नेते यांच्या नेतृत्वात निदर्शने करण्यात आली. यावेळी आ.डॉ.देवराव होळी, आमदार क्रिष्णा गजबे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, गडचिरोली शहराध्यक्ष सुधाकर येनगंधलवार, गजानन येनगंधलवार, प्रदेश सचिव प्रमोद पिपरे, रमेश भुरसे, देसाईगंजचे नगराध्यक्ष श्याम उईके, प्रकाश गेडाम, रेखा डोळस, प्रतिभा चौधरी, अनिल पोहनकर, रवींद्र ओल्लालवार, अनिल करपे, कुरखेडाचे भाजप तालुकाध्यक्ष राम लांजेवार यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी खा. अशोक नेते व अन्य मंडळींनी आपल्या भाषणात संसदेचे कामकाज बंद पाडणाऱ्या काँग्रेस खासदारांविरोधात जोरदार टीका केली. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने जनधन योजना, पेंशन योजना, सुकन्या योजना, शेतकऱ्यांना दीडपट भरपाई, स्वच्छ भारत अभियान व अन्य महत्वाच्या योजना राबविल्या. त्यामुळे काँग्रेस पक्षाचे नेते आपले अस्तित्व शोधण्यासाठी संसदेचे कामकाज बंद पाडून लोकशाहीचा खून करीत आहेत, अशी टीका खा. अशोक नेते यांनी केली. (स्थानिक प्रतिनिधी)अस्तित्वासाठी केविलवाणा प्रयत्न!पत्रकार परिषदेत खा. अशोक नेते म्हणाले, २१ दिवस संसदेचे अधिवेशन होते. हे अधिवेशन सुरळीत चालून लोकांचे प्रश्न सुटावेत, हा त्यामागचा हेतू होता. परंतु काँग्रेसच्या ‘गोंधळी’ खासदारांनी संसदेत गोंधळ घातला. आम्ही नियम १९३ अंतर्गत चर्चेस तयार होतो. परंतु काँग्रेसने चर्चा न करताच वाटेल तसे आरोप केले. सुषमा स्वराज यांनी त्यांच्यावरील आरोपांना प्रत्युत्तर दिल्यानंतर काँग्रेस नेत्यांना बोलण्यास जागाच उरली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौरे करुन भारतातील गुंतवणूक वाढवीत आहेत. यामुळे जगाचे लक्ष भारताकडे लागले आहे. अशावेळी काँग्रेस स्वत:च्या अस्तित्वासाठी केविलवाणा प्रयत्न करीत आहे, अशी टीका खा. अशोक नेते यांनी पत्रकार परिषदेत केली.
काँग्रेस खासदारांविरोधात भाजपाची निदर्शने
By admin | Updated: August 17, 2015 01:07 IST