गडचिराेली : स्थानिक गोंडवाना विद्यापीठाच्या डाटा सेंटरचे उद्घाटन व मॉडेल कॉलेजच्या इमारत बांधकामाचे भूमिपूजन समारंभाकरिता राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे व बहुजन कल्याण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार आणि राज्याचे माजी अर्थमंत्री तथा लोकलेखा समितीचे अध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार हे चार माेठे नेते ४ फेब्रुवारी रोजी गाेंडवाना विद्यापीठाच्या मंचावर उपस्थित राहणार आहेत.
गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ. श्रीनिवास वरखेडी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या कार्यक्रमात ‘डाटा सेंटर’चे उद्घाटन ना. उदय सामंत यांच्या हस्ते होणार असून, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विद्यापीठाच्या ‘मॉडेल कॉलेज’चे भूमिपूजन होणार आहे. तर विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते आदर्श महाविद्यालय गडचिरोलीच्या संस्थात्मक विकास आराखड्याचे प्रकाशन होणार आहे. समारंभाचे विशेष अतिथी म्हणून माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार उपस्थित राहतील. मुख्य अतिथी म्हणून आमदार डॉ. देवराव होळी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव ओमप्रकाश गुप्ता, उच्च शिक्षण विभागाचे शिक्षण संचालक डॉ. धनराज माने, डॉ. अभय वाघ, नगराध्यक्ष योगिता पिपरे, प्रमुख अतिथी म्हणून गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे आदी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन कुलसचिव डॉ. अनिल चिताडे यांनी केले आहे.
बाॅक्स....
उच्च शिक्षणातील समस्या जाणून घेणार
महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत ‘उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय एट गडचिरोली’ हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत शिक्षणमंत्री उदय सामंत हे ४ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता गोंडवाना विद्यापीठात उच्च व तंत्र शिक्षण विभागातील मंत्रालय व संचालकस्तरावरील अधिकारी तथा जवळपास २०० कर्मचाऱ्यांसह गोंडवाना विद्यापीठात प्रत्यक्ष उपस्थित राहून विद्यार्थी, पालक, शिक्षक, प्राचार्य, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यापीठीय कर्मचारी, शैक्षणिक संस्था आदी विविध घटकांच्या अडीअडचणी ऐकून घेऊन त्या सोडविणार आहेत. गोंडवाना विद्यापीठाने सर्व संबंधित घटकांच्या सोयीसाठी विद्यापीठाच्या ‘डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू डॉट यूएनआयजीयूजी डॉट एसी डॉट इन’ या संकेतस्थळाच्या मुखपृष्ठावर उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय एट गडचिरोली’ हे विशेष पोर्टल निर्माण केले आहे. येथे नागरिकांना इंग्रजी अथवा युनिकोड मराठीतून आपले प्रश्न मांडता येणार आहे. निवेदनाची सॉफ्ट प्रत जोडण्याची व्यवस्थाही येथे आहे. त्यानुसार आपली निवेदने आभासी सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ज्यांना आभासी निवेदन सादर करणे शक्य होणार नाही, त्यांनाही प्रत्यक्ष उपस्थित राहून मंत्र्यांसमक्ष आपले निवेदन सादर करता येणार आहे.