निमलगुड्डम येथे समस्या : महावितरणकडून कार्यवाही नाहीगुड्डीगुडम : अहेरी तालुक्यातील ग्रामपंचायत तिमरम-गुड्डीगुडम अंतर्गत असलेल्या निमलगुडम येथे मुख्य रस्त्यावर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेजवळ गेल्या अनेक वर्षांपासून वाकलेल्या स्थितीत वीज खांब आहे. सातत्याने मागणी करूनही महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वाकलेला खांब बदलविला नाही. त्यामुळे सदर वाकलेल्या वीज खांबामुळे विद्यार्थी तसेच नागरिकांना धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. निमलगुडम गावात १९९१ मध्ये वीज खांब उभारून वीज पुरवठा सुरू करण्यात आला. तेव्हापासून मुख्य रस्त्यावर खांब आहे. मात्र सदर खांब गेल्या अनेक वर्षांपासून वाकलेल्या स्थितीत आहे. या खांबाला आता २५ वर्ष पूर्ण झाली आहेत. सदर खांब जुना असून जीर्ण होत असतानाही येथे महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी नवा खांब दिला नाही. या वाकलेल्या खांबामुळे वीज तारा लोंबकळत असल्याने धोका निर्माण झाला आहे. वीज खांब हटविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)
वाकलेला वीज खांब धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2016 01:41 IST