आरमोरी : २०१४-१५ या वर्षात बुडीत मजुरीचा लाभ चार हजार गरोदर मातांना देण्यात आला आहे. त्याचबरोबर या तालुक्याला आरोग्याच्या विविध योजनांसाठी देण्यात आलेले उद्दिष्टही पूर्ण झाले आहे.नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी तालुका व प्रत्येक मोठ्या गावांमध्ये रुग्णालय उघडण्यात आली आहेत. या प्रत्येक रुग्णालयाला विविध आरोग्यविषयक योजनांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. आरमोरी तालुक्यात टीएचओ डॉ. एस. आर. मोटे यांच्या मार्गदर्शनात नियोजबद्द विविध योजना राबविण्यात आल्या. आरमोरी तालुक्याला २०१४-१५ या वर्षात ७०६ कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मार्च अखेर ७११ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. विशेष म्हणजे या वर्षात एकही बालमृत्यू व मातामृत्यू झाला नाही. रुग्णालयात प्रसूती होण्याचे प्रमाण वाढले आहेत. मे २०१४ मध्ये सॅमचे २१, मॅमचे १४१ बालके कुपोषित असल्याचे आढळून आले होते. या बालकांवर अंगणवाडी कार्यकर्ते व आरोग्य कर्मचाऱ्यांनी केलेल्या परिश्रमामुळे कुपोषणाचे प्रमाण कमी झाले. फेब्रुवारी महिन्याच्या अखेर सॅमचे ९ व मॅमचे ११० बालक शिल्लक असल्याचे आढळून आले. तुरळक आजार वगळता साथरोगांचे प्रमाण कमी होते. मानवविकास कार्यक्रमांतर्ग वडधा येथे ६, वैरागड ३, भाकरोंडी ३ व देलनवाडी येथे ३ असे एकूण १५ आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरादरम्यान ग्रामीण भागातील हजारो महिला, नागरिक, बालक व इतर आजारांचे रुग्ण यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. ज्या रुग्णांना एखादा आजार असल्याचे आढळून आल्यानंतर त्या रुग्णांना वेळीच औषधोपचार व मार्गदर्शनही करण्यात आले. महिला आरोग्य अभियानांतर्गत सर्व उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र व तालुकास्तरावर आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यादरम्यान शर्करा तपासणी, गरोदर माता नोंदणी, रक्तदाब तपासणी, सिकलसेल तपासणी, पोषण आहार याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. किशोर स्वास्थ कार्यक्रमांतर्ग किशोर मुला, मुलींचे मेळावे घेऊन त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. हिवताप कार्यक्रमांतर्गत १० दिवस कार्यक्रम राबवून प्रत्येक गावात आरोग्य सेवकाद्वारे गृहभेटीचे नियोजन करण्यात आले. ५४ आशांद्वारे विविध प्र्रकारचे उपचार करून आरोग्य सेवा बळकट करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. जननी सुरक्षा योजनेंतर्गत प्रत्येक गरोदर मातेला दवाखान्यात भरती करण्याकरिता वाहन उपलब्ध करून देण्यात येत आहे. हे सर्व नियोजन यशस्वी करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुकारे, डॉ. वाघधरे, डॉ. डाखोरे, डॉ. गायकवाड, तालुका आरोग्य कार्यालयातील कर्मचारी बल्लाळ, खापर्डे, मेश्राम, डोईजड, मंगेश नैताम आदी परिश्रम घेत आहेत. (प्रतिनिधी)
चार हजार गरोदर मातांना बुडीत मजुरीचा लाभ
By admin | Updated: April 4, 2015 00:53 IST