चामोर्शी : बँक ग्राहकांच्या वेळेची बचत व्हावी तसेच ग्राहकांना वेळेवर पैसे उपलब्ध होऊन आर्थिक व्यवहार करण्यास सोयीचे व्हावे या हेतून सर्वच राष्ट्रीयकृत बँकांनी चामोर्शी तालुक्यासह सर्व तालुका मुख्यालयी तसेच गडचिरोली जिल्हा मुख्यालयी एटीएम सेवा सुरू केली आहे. मात्र चामोर्शी, गडचिरोली व अन्य शहरातील तसेच एटीएम बंद स्थितीत राहतात. यामुळे ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे. राष्ट्रीयकृत बँकांनी गडचिरोली, चामोर्शी, आरमोरी, धानोरा, देसाईगंज, अहेरी व अन्य तालुक्याच्या ठिकाणी एटीएम सेवा सुरू केली. मात्र अनेक ठिकाणच्या एटीएममधील पैसे लवकरच संपतात. यामुळे अनेक ग्राहकांना इतर ठिकाणच्या एटीएमकडे धाव घ्यावी लागते. गेल्या अनेक दिवसांपासून अनेक शहरात मोजकेच एटीएम २४ तास सुरू राहतात. मात्र ग्राहकांची संख्या मोठी असल्याने या ग्राहकांना एटीएमसमोर तासन्तास रांगेत उभे राहावे लागते. गडचिरोली शहरातील अनेक एटीएममध्ये वारंवार बिघाड येत असतो. यामुळे शहरातील ग्राहकांची आर्थिक व्यवहारासाठी बरीच धावपळ होत असल्याची दिसून येते. प्रसंगी उसनवारी घेऊन आर्थिक व्यवहार करावा लागत असल्याचे ग्राहकांनी सांगितले. (शहर प्रतिनिधी)
बँकांची एटीएम सेवा कुचकामी
By admin | Updated: August 6, 2014 23:50 IST