एकाही घरकुलाचे काम पूर्ण नाही : लाभार्थ्यांसह यंत्रणेची अनास्थागडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात इंदिरा आवास योजनेंतर्गत २०१४-१५ या वर्षात एकूण ७ हजार ७९४ घरकूल मंजूर करण्यात आले. यापैकी भामरागड तालुक्यात ६०४ घरकूल मंजूर करण्यात आले. मात्र आॅक्टोबर अखेरीसपर्यंत राज्यपालांनी दत्त घेतलेल्या नक्षलप्रभावित भामरागड तालुक्यात एकाही घरकुलाचे बांधकाम पूर्ण झाले नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. लाभार्थ्यांसह यंत्रणेच्या अनास्थेमुळे भामरागड तालुका घरकूल बांधकामात सर्वाधिक माघारल्याचे चित्र दिसून येत आहे. भामरागड तालुक्याला २०१४-१५ या वर्षात ६०४ घरकुलाचे उद्दिष्ट देण्यात आले. तेवढेच घरकूल मंजूर करण्यात आले. यापैकी ६०३ घरकूल सुरू करण्यात आले असून एका घरकुलाचा शुभारंभच झाला नसल्याची माहिती आहे. सुरू करण्यात आलेल्या भामरागड तालुक्यातील ६०३ घरकुलांपैकी ३९१ घरकुलाचे काम जोता स्तरापर्यंत आहे. तर २१२ घरकुलाचे काम दरवाजास्तरापर्यंत पोहोचले आहे. भामरागड तालुका पाठोपाठ अहेरी तालुक्यातही घरकूल बांधकामाला गती नसल्याचे दिसून येते. अहेरी तालुक्यात मंजूर १ हजार ४२५ घरकुलांपैकी १ हजार ३०४ घरकुलांचे बांधकाम सुरू करण्यात आले. यापैकी केवळ २३ घरकुलांचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. तब्बल १२१ घरकुलाच्या बांधकामाला सुरूवातच झाली नसल्याने घरकूल योजनेचा अहेरी तालुक्यात बट्ट्याबोळ झाला आहे. अहेरी तालुक्यात १९१ घरकुलाचे काम जोता तर २९० घरकुलाचे काम दरवाजास्तरापर्यंत पोहोचले आहे. चामोर्शी तालुक्यात एकूण ६३६ घरकूल मंजूर करण्यात आले. यापैकी ६०३ घरकुलाच्या बांधकामाला सुरूवात करण्यात आली असून आतापर्यंत केवळ ५२ घरकुलाचे काम पूर्ण झाले आहे. तर ५९१ घरकूल अपूर्णावस्थेत आहे. तब्बल ३३ घरकुलाच्या बांधकामाला अद्यापही सुरूवात झाली नसल्याची माहिती आहे. ६०३ घरकुलांपैकी ३९९ घरकुलाचे काम जोता तर १५२ घरकुलाचे काम दरवाजास्तरापर्यंत पोहोचले आहे. धानोरा तालुक्यात एकूण ९७४ घरकूल मंजूर करण्यात आले. यापैकी ९७१ घरकुलाचे काम सुरू करण्यात आले असून आतापर्यंत १४९ घरकुलाचे काम पूर्ण झाले आहे. तर तब्बल ८२२ घरकूल अद्यापही पूर्णावस्थेत आहे. आरमोरी तालुक्यात तीन घरकुलाचे काम लाभार्थ्यांनी सुरूच केली नसल्याची माहिती आहे. कोरची तालुक्यात मंजूर ६९४ घरकुलांपैकी केवळ १०८ घरकुलाचे काम पूर्ण करण्यात आले असून तब्बल ५८६ घरकूल अपूर्णावस्थेत आहे. कुरखेडा तालुक्यात मंजूर ९०८ घरकुलांपैकी ३५२ घरकुलांचे काम पूर्ण करण्यात आले असून ५५६ घरकूल अपूर्णावस्थेत आहे. कुरखेडा तालुक्यात घरकूल बांधकामाची गती चांगली असल्याची दिसून येते. मुलचेरा तालुक्यात ३१९ मंजूर घरकुलांपैकी १०१ घरकूल पूर्ण करण्यात आले असून २१८ घरकूल अपूर्ण आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)
घरकूल कामात भामरागड मागे
By admin | Updated: November 15, 2015 01:01 IST