गडचिरोली : आयटकशी संलग्नीत असलेल्या महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनियन व अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने ३१ मार्च रोजी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात जिल्हाभरातील शेकडो कर्मचारी सहभागी झाले होते. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एप्रिल २०१४ च्या शासन निर्णयानुसार पगारवाढ द्यावी, अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे थकीत मानधन, प्रवास भत्ता व इंधन बिल त्वरित द्यावा, दर महिन्याला ५ तारखेच्या आत नियमितपणे मानधन द्यावे, एप्रिल २०१४ पासून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना पेंशनची एक रकमी रक्कम त्वरित द्यावी, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना व पूर्व प्राथमिक शिक्षिकेचा दर्जा देऊन वेतनश्रेणी लागू करावी, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना नक्षलाईट भत्ता द्यावा, भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता १५ अंगणवाडी केंद्रामागे एका पर्यवेक्षीकेची नेमणूक करावी, अंगणवाडी केंद्राचे वीज भरण्यावरील तोडगा काढण्यात यावा, गणवेश धुलाई भत्ता द्यावा, शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता द्यावा, रिक्त असलेल्या सेविका व मदतनिसांच्या जागा त्वरित भराव्यात, प्रत्येक अंगणवाडी केंद्राला स्वतंत्र इमारतीचे बांधकाम करण्यात यावे, मिनी अंगणवाडी सेविकेप्रमाणे मानधन द्यावे, महागाईनुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दरमहा १५ हजार रूपये मानधन द्यावे, वैद्यकीय रजा व खर्चपूर्ती लागू करावी आदी मागण्यांसाठी जिल्हाभरातील शेकडो अंगणवाडी कर्मचारी जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपस्थित राहून धरणे आंदोलन केले. दिवसभर आंदोलन केल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केले. यावेळी मीरा कुरजेकर, कुंदा बंडावार, दुर्गा कुरवे, रूपा पेंदाम, मिनाक्षी झोडे, ज्योती कोमलवार, जहारा शेख, लता मडावी, बसंती अंबादे प्रामुख्याने उपस्थित होत्या.महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेच्या वतीनेही आंदोलन करण्यात आले. स्वयंपाकी व मदतनिस यांना पूर्ववत कामावर घ्यावे, शासनाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे मानधन अदा करावे, शासन निर्णयाप्रमाणे २५ विद्यार्थ्यांपर्यंत एक हजार रूपये, २६ ते १९९ विद्यार्थ्यांपर्यंत दोन हजार रूपये मानधन ठरविण्यात आले आहे. त्यानुसार स्वयंपाकी महिलांना मानधन मिळत होते. परंतु शिक्षणाधिकारी यांनी चुकीचा निकष लावून २५ पेक्षा जास्त विद्यार्थी आहेत त्या ठिकाणी दोन स्वयंपाकी नेमण्याची चुकीच आदेश दिले आहेत. अनेक शाळांमध्ये नवीन व अतिरिक्त स्वयंपाकी नियुक्त करण्यात आल्यामुळे पूर्वीपासून काम करीत असलेल्या व्यक्तीच्या मानधनात कोणतीही वाढ झाली नाही. त्यांच्यावर एकप्रकारचा अन्यायच झाला आहे. हा अन्याय दूर करण्यात यावा, या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देऊन या मुद्यावर चर्चा केली. आंदोलनाचे नेतृत्त्व संघटनेचे जिल्हा संघटक देवराव चवळे, शालेय पोषण आहार कर्मचारी युनियनचे विनोद झोडगे, जि. प. सदस्य अमोल मारकवार यांनी केले. आंदोलनाला जिल्हाभरातील शेकडो अंगणवाडी व शालेय पोषण आहार कर्मचारी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)
अंगणवाडी व पोषण आहार कर्मचाऱ्यांचे धरणे
By admin | Updated: April 1, 2015 01:34 IST