प्रतीक मुधोळकर लोकमत न्यूज नेटवर्क अहेरी : गरोदर माता आणि बाल मृत्यू रोखण्यासाठी शासनाने अहेरी येथे पाच वर्षांपूर्वी नवीन महिला व बाल रुग्णालयाचे बांधकाम सुरू केले. एक वर्षापूर्वी रुग्णालयाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, अद्याप या महिला व बाल रुग्णालयाचे उद्घाटन झाले नाले. संपूर्ण भार जुन्या अहेरी उपजिल्हा रुग्णालयावर पडत असून, महिला रुग्णांची खाटांअभावी हेळसांड होत आहे. महिला व बाल रुग्णालयाच्या उद्घाटनाचा मुहूर्त कधी निघणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात भामरागड, सिरोंचा, एटापल्ली, मुलचेरा, अहेरी तालुक्यांसह तेलंगणा व छत्तीसगड राज्यातील महिला व बाल रुग्ण दाखल होत असतात. अहेरी उपजिल्हा रुग्णालयात साधारण तथा सिजेरियन प्रसूती केली जाते. मात्र, ५० बेड संख्या असलेल्या अहेरी उपजिल्हा रुग्णालयात महिलांना आपल्या नवजात बाळांना घेऊन व्हारांड्यात तसेच खाली गादीवर झोपावे लागत आहे. अहेरी उपजिल्हा रुग्णालयात जर प्रसूतीमध्ये काही अडचणी आल्यास महिला रुग्णास किंवा बाळास गडचिरोली किंवा चंद्रपूर येथे रेफर करण्यात येते.
अहेरी उपजिल्हा रुग्णालयात खाटांची व्यवस्था आहे. त्यात २५ खाटा साधारण वॉर्ड तर २५ खाटा आयसीयू वॉर्ड अशी मांडणी आहे. मात्र, दररोज पाच ते दहा प्रसूती येथे केल्या जातात. त्यामुळे महिला रुग्ण व नवजात बाळांना बेड उपलब्ध होत नाही. अशावेळी महिला व बाळांना ठेवायचे कुठे, असा प्रश्न रुग्णालय प्रशासनास पडत असते. अपघात, इतर रुग्ण, सर्पदंश, कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया, हायड्रोसिल, मलेरिया, टायफॉइडचे रुग्णसुद्धा अहेरी उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेतात.
कोट्यवधी रुपये खर्चुन गरोदर महिला व बाल रुग्णालय अहेरी येथे बांधण्यात आले. तिथे आवश्यक यंत्रसामग्रीही लावण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेस केंद्रीय सुरक्षा बलांना याच रिकाम्या रुग्णालयात आश्रय देण्यात आला होता.
कोट्यवधी रुपये खर्चुन बांधण्यात आलेल्या १०० खाटांचे महिला व बाल रुग्णालय महिलांच्या व नवजात शिशू यांच्या कामात पडत नसेल तर रुग्णालयाचा फायदा काय, असा प्रश्न निर्माण होत आहे. तत्काळ पदभरती करून रुग्णालय सुरू करावे, अशी मागणी नागरिकांची आहे.
"अहेरी येथील महिला व बाल रुग्णालयाकरिता वैद्यकीय अधिकारी ते सफाई कामगार असे १०० ते १५० कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. पदभरतीबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. लवकरच पदभरतीची प्रकिया सुरु होईल आणि अहेरी महिला व बाल रुग्णालयात सुरू होईल. पदभरती झाली नसल्याने रुग्णालय सुरू करण्यास अडचण येत आहे."- डॉ. शशिकांत शंभरकर, आरोग्य उपआयुक्त
"सदर इमारत प्रशासनाकडे हस्तांतरित झालेली नाही. आधी इमारत आमच्या स्वाधीन होईल. नव्याने पदभरती होईल. तिथे खूप मोठ्या स्टाफची आवश्यकता पडणार आहे. पदभरती झाल्यावर रुग्णालय सुरू होईल. आताही रुग्णांची गैरसोय होणार नाही याची पूर्ण खबरदारी आरोग्य विभागामार्फत घेतली जात आहे." - डॉ. माधुरी किलनाके, जिल्हा शल्यचिकित्सक