अहेरी : गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागातील चार तालुक्यांचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या अहेरी येथे तालुका न्यायालयाची नवी इमारत तीन कोटी रूपये निधीतून उभारण्यात आली आहे. मात्र सुसज्ज इमारतीच्या उद्घाटनासाठी अद्याप मुहूर्त गवसला नसल्याने इमारतीतून न्यायालयीन कामकाज सुरू झालेले नाही. गडचिरोली मुख्यालयापासून २०० ते अडीचशे किमी अंतरावर असलेल्या अहेरी येथे राज्य शासनाने उपजिल्हाधिकारी कार्यालय तसेच पोलीस जिल्हा निर्माण केला. याच बरोबर तालुका दिवाणी न्यायालयासाठी तीन कोटी रूपये निधीतून तीन मजली सुसज्ज इमारत उभी केली. उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या बाजुला सदर न्यायालय इंग्रज कालीन इमारतीत सुरू होते. परंतु सदर इमारत न्यायालयाच्या कामकाजासाठी अपुरी पडत होती. अहेरी न्यायालयात एटापल्ली, भामरागड व मुलचेरा तालुक्यातूनही प्रकरण येतात. त्यामुळे येथे नेहमीच पक्षकार व नागरिकांची गर्दी राहते. त्यामुळे नवी इमारत बांधण्यात आली. नव्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून उद्घाटनाचा मुहूर्त अद्याप गवसलेला नसल्याने न्यायालयाचे कामकाज नव्या इमारतीतून सुरू झालेले नाही. गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली येथे जिल्हा सत्र न्यायालय आहे. अहेरी उपविभागातील नागरिकांना ३५० किमीचा प्रवास करून या न्यायालयात जावे लागते. त्यामुळे अहेरी येथे सत्र न्यायालय सुरू करण्यात यावे, अशी मागणी आहे. अहेरी येथे सत्र न्यायालय सुरू झाल्यास या भागातील तसेच उर्वरित चार तालुक्यातील नागरिकांना न्यायदानाच्या दृष्टीने सोयीचे होणार आहे. सध्या सिरोंचा व अहेरी येथे तालुका न्यायालय आहे. सत्र न्यायालय अहेरी येथे सुरू झाल्यास मुलचेरा, एटापल्ली, भामरागड, अहेरी व सिरोंचा तालुक्याला सोयीचे होईल.(तालुका प्रतिनिधी)
न्यायालय वास्तू उद्घाटनाच्या प्रतीक्षेत
By admin | Updated: January 31, 2015 23:20 IST