गडचिरोली : विदर्भात तसेच गडचिरोली जिल्ह्यात ट्रकद्वारे नियमाला डावलून ओव्हरलोड माल वाहतूक गेल्या अनेक दिवसांपासून सर्रास सुरू आहे. परवानापेक्षा अधिक माल वाहनात भरून नेत असल्याने जिल्ह्यातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. मात्र याकडे परिवहन व पोलीस विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे विदर्भासह जिल्ह्यातील ओव्हरलोड वाहतुकीवर आळा घालावा, अशी मागणी रमेश गुंडरवार यांच्यासह अनेक नागरिकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.निवेदनात रमेश गुंडरवार यांनी म्हटले आहे की, मालवाहक ट्रकांना २५ टनाचा परवाना असला तरी वाहनात सरासरी ४० टन माल भरून वाहतूक केली जाते. १६ टनाचा परवाना असलेल्या वाहनातून ३० टन माल भरून वाहतूक केली जाते. ओव्हरलोड वाहतुकीमुळे जिल्ह्यातील रस्ते खराब झाले आहे. परिवहन विभाग व पोलीस प्रशासन नियमानुसार मालाची वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकांवर कारवाई करीत असल्याचा आरोपही रमेश गुंडरवार यांनी केला आहे. रेतीघाटाचे लिलाव झाले नसतानाही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रेतीचे अवैध उत्खनन करून वाहतूक केली जात आहे. मात्र याकडे संबंधीत विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. एका रायॅल्टीवर दिवसभर ट्रीप वाहतूक केली जात आहे. अवैध रेती उत्खननामुळे घराचे बांधकाम करण्यासाठी घरमालकांना रेतीकरीता अधिकची किंमत द्यावी लागत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना नव्या घराचे बांधकाम करणे कठीण झाले आहे. (प्रतिनिधी)
ओव्हरलोड वाहतुकीवर आळा घाला
By admin | Updated: November 26, 2014 23:06 IST