आष्टी : एपीएल कार्डधारकांना मागील दोन महिन्यांपासून धान्याचा पुरवठा केला जात नसल्याने सदर कुटुंबांना खुल्या बाजारातून धान्य खरेदी करावे लागत आहे. शासनाकडून सर्वच कार्डधारकांना यापूर्वी धान्याचा पुरवठा केला जात होता. अन्नसुरक्षा योजनेंतर्गत असलेले नागरिक व अंत्योदयच्या कार्डधारकांना दोन रूपये किलो गहू व तीन रूपये किलो तांदूळ या दराने धान्याचा पुरवठा केला जातो. तर एपीएल कार्डधारकांनाही जवळपास आठ रूपये दराने धान्य उपलब्ध करून दिले जात होते. मात्र मागील दोन महिन्यांपासून एपीएल कार्डधारकांचे धान्यच येणे बंद झाले आहे. नागरिक याबद्दल गावातील स्वस्त धान्य दुकानदाराला वेळोवेळी विचारणा करीत आहेत. तर काही नागरिक प्रत्यक्ष तहसील कार्यालयात जाऊन विचारपूस करीत आहेत. शासनानेच एपीएलचे धान्य पाठविले नसल्याचे उत्तर त्यांना मिळत आहे. खुल्या बाजारात धान्याचे भाव गगणाला मिळले आहेत. दिवसाची मजुरी केवळ धान्य खरेदी करण्यातच गेल्यानंतर इतर गरजा कशा भागवाव्या, असा प्रश्न या कुटुंबांसमोर निर्माण होत आहे. त्यामुळे शासनाने याही कुटुंबाना पूर्वीप्रमाणेच धान्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)
एपीएल कार्डधारक धान्यापासून वंचित
By admin | Updated: January 25, 2015 23:15 IST