लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : कुरखेडा येथील संस्कार क्रेडिट को-ऑप. सोसायटी म. गडचिरोली या संस्थेतील लाखोंच्या गैरव्यवहार प्रकरणात चेअरमनसह संचालकांचा जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळून लावला. भाजप तालुकाध्यक्ष चांगदेव फाये उपाध्यक्ष असलेल्या या संस्थेतील गैरव्यवहार चव्हाट्यावर आल्याने खळबळ उडाली होती.
वेदप्रकाश विजयसिंग राठोड (३८, रा. गांधी वॉर्ड चौक, कुरखेडा) हे संस्कार क्रेडिट को ऑप. सोसायटीचे भागधारक व दैनंदिन बचत खातेधारक आहेत. १९ डिसेंबरला त्यांनी कुरखेडा ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, कोरची शाखेतील तत्कालीन व्यवस्थापक शुभम राजकुमार परिहार यांच्या खात्यातून परस्पर २१ लाख ५० हजार रुपये कर्ज उचलले, प्रभा रामकुमार परिहार यांच्या नावे २० लाख ९९ हजार ९०० रुपये कर्ज उचलले. मुनेश्वर पारधी, लोमेश पारधी या खातेदारांच्या नावेही परस्पर कर्ज उचलल्याचे तक्रारीत नमूद आहे. संस्थेचे लेखापरीक्षण केले नाही. दायित्व नियम ३५चे उल्लंघन केले, निधी निर्मिती व विनियोगाबाबत वार्षिक सभेत मंजुरी घेतली नाही, असा दावाही फिर्यादीत केला होता.
यावरून संस्कार क्रेडिट को-ऑप. सोसायटीचा अध्यक्ष मनीष फाये, मुख्य कार्यकारी अधिकारी धीरज बांगरे, संस्था उपाध्यक्ष व भाजप तालुकाध्यक्ष चांगदेव फाये, संचालक दीनदयाल भट्टड, नितीन कावळे, मंगेश मांडवे, हरीश टेलका, लक्ष्मण धुळसे, परसराम नाट, चेतना कुंभलवार, मंगला वडीकर, व्यवस्थापक दिवाकर देवांगण, कर्ज अधिकारी प्रल्हाद लांजे यांच्यावर गुन्हा नोंद झाला होता.
तपास संथगतीने दरम्यान, आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी येथील जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज केला होता. अतिरिक्त सत्र न्या. प्रशांत सित्रे यांनी ६ जानेवारीला हा अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे आरोपींच्या अडचणीत वाढ झाली आहे. दरम्यान, यातील एकाही आरोपीला अद्याप पोलिसांनी ताब्यात घेतलेले नाही, त्यामुळे तपासाची गती एवढी संथ का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.