एक पुरावा ग्राह्य : निवडणूक विभागाची माहितीगडचिरोली : विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी ज्या मतदारांकडे मतदान ओळखपत्र नाही, त्यांच्यासाठी निवडणूक आयोगाने ११ पर्याय जाहीर केले आहेत. यापैकी एक पुरावा मतदानासाठी ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरला जाणार आहे, अशी माहिती निवडणूक विभागाने दिली आहे.निवडणूक विभागाने जाहीर केलेल्या ओळखपत्र पर्यायामध्ये मतदान चिठ्ठीचा समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व मतदारांना मतदान चिठ्ठ्यांचे वाटप घरपोच करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील ९५ टक्के मतदारांच्या मतदार यादीवर त्यांचे छायाचित्र देण्यात आले आहेत. त्यामुळे मतदार चिठ्ठी असताना इतर कोणतेही ओळखपत्र सोबत नसले तरी मतदाराला मतदान करता येईल. मतदान ओळखपत्र नसतानाही मतदाराला पर्यायी ओळखपत्र दाखविल्यानंतर मतदान करता येणार आहे. त्यासाठी मतदार यादीत संबंधितांचे नाव असणे आवश्यक आहे. ज्या मतदारांचे यादीत नाव नसेल अशा व्यक्तींना मतदान करता येणार नाही. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या ११ पर्यायी ओळखीच्या पुराव्याशिवाय इतर कोणतेही ओळखपत्र दाखवून मतदान करण्यास परवानगी दिली जाणार नाही. मतदान ओळखपत्राला पर्यायी पुरावे म्हणून पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, राज्य व केंद्र शासन, सार्वजनिक क्षेत्र, पब्लिक लिमिटेड कंपनीतील कर्मचाऱ्यांचे फोटो असलेले ओळखपत्र, बँक, पोस्टाचे फोटो असलेले पासबुक, पॅनकार्ड, आधार कार्ड, मनरेगा जॉब कार्ड, राष्ट्रीय जनसंख्या रजिस्टरने दिलेले स्मार्ट कार्ड, श्रम मंत्रालयाचे विमा स्मार्ट कार्ड, फोटो असलेले पेंशन ओळखपत्र, जिल्हा निवडणूक विभागाकडून वाटप करण्यात आलेली फोटो असलेली मतदार चिठ्ठी (व्होटर स्लिप) आदींचा समावेश आहे. या सर्व पुराव्यांपैकी मतदाराकडे एक पुरावा मतदानासाठी ग्राह्य धरला जाणार आहे, अशी माहिती निवडणूक विभागाने दिली आहे. (शहर प्रतिनिधी)
मतदानासाठी ओळखपत्राचे ११ पर्याय जाहीर
By admin | Updated: October 14, 2014 23:18 IST