धानोरा : तालुक्यातील सावरगाव परिसरात महिन्याभरापासून जनावरांना अज्ञात रोगाची लागण झाली असून या अज्ञात रोगामुळे सावरगाव परिसरातील जवळपास ५० जनावरे दगावल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे.धानोरा तालुक्यात सावरगाव परिसरात गेल्या महिनाभरापासून जनावरांना अज्ञात रोगाची लागन झाली आहे. सावरगाव ग्रामपंचायतींतर्गत बोधनखेडा येथील शेतकऱ्यांचे आठ जनावरे या रोगाने दगावले आहे. २९ एप्रिल रोजी सगराम देवसिंग गावडे व सावंत वादी कुजाम या शेतकऱ्याचे प्रत्येकी दोन बैल अज्ञात रोगाने दगावले. तसेच रैनू हलामी, नरसिंग बोगा, मन्साराम तुलावी, मानसिंग तुलावी, शामराव कुडो सर्व रा. बोधनखेडा यांचे बैल रोगाने दगावले. कुलभट्टी येथील काही शेतकऱ्यांचे बैल दगावले असल्याची माहिती आहे. जनावरांचा पाय अचानक निकामी होणे, पोटात दुखणे, गळा दुखणे आदी प्रकारची लक्षणे दिसून येऊन काही वेळातच जनावर दगावत असल्याचे या शेतकऱ्यांनी सांगितले आहे. जनावर दगावून आर्थिक संकट कोसळलेल्या सर्व शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी लता पुंगाटे यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)
जनावरांना अज्ञात रोगाची लागण
By admin | Updated: May 1, 2015 01:25 IST