भामरागड : बालकांना सकस आहार व पूर्व प्राथमिक शिक्षणाचे धडे देण्यासाठी अंगणवाडी केंद्र महत्त्वाचे ठरते. या केंद्रातूनच बालकांचा शारीरिक व बौद्धिक विकास साधण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु फोदेवाडा येथील अंगणवाडी इमारत जीर्णावस्थेत असल्याने बालकांना इमारतीबाहेर पटांगणात बसून आहार व शिक्षणाचे धडे घ्यावे लागत आहेत.
लाहेरीपासून आठ किमी अंतरावर असलेल्या फोदेवाडा गावातील अंगणवाडी इमारत अनेक वर्षांपासून दुर्लक्षित आहे. मात्र प्रशासनाकडून या समस्येची अद्यापही दखल घेण्यात आली नाही. केंद्र व राज्य शासनात अनेक योजनांचा लाभ केंद्राच्या माध्यमातून लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविला जातो. मात्र फोदेवाडा अंगणवाडीकडे दुर्लक्ष असल्याने बालकांना पटांगणात आहार घ्यावा लागत आहे. अंगणवाडी केंद्रात आल्यानंतर बालके परिसरात फिरत असतात. त्यामुळे बालकांच्या जीवाला धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या इमारतीचे निर्लेखन करावी, अशी मागणी पालकांनी केली आहे.