जिमलगट्टा : गडचिरोलीचे तत्कालीन मुख्यवनसंरक्षक प्रादेशिक टी. एस. के. रेड्डी यांनी अनेक योजना वन विभागात अभिनव योजनांच्या नावाखाली राबविल्या. यापैकीच एक योजना म्हणजे, अगरबत्ती प्रकल्प. या अगरबत्ती प्रकल्पासाठी बांबू काड्यांचा पुरवठा करणाऱ्या अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा वन परिक्षेत्रातील येंकाबंडा येथील ३० ते ४० मजुरांना मागील सहा महिन्यांपासून मजुरी देण्यात आली नव्हती. या मजुरांनी मंगळवारी जिमलगट्टा वन परिक्षेत्र कार्यालयासमोर आंदोलन केले. त्यानंतर सहायक उपवनसंरक्षक पाटील यांनी मजुरांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली व त्यांना येत्या आठ दिवसात मजुरी वितरित केली जाईल, असे आश्वासन दिले. या आश्वासनावर समाधान व्यक्त करून मजुरांनी आपले आंदोलन मागे घेतले. येंकाबंडा परिसरातील अनेक गावांमध्ये बांबू अगरबत्ती प्रकल्पाला काड्या पुरवठा करणाऱ्या मजुरांना त्यांचा मोबदला देण्यात आला नाही. वन विभाग माध्यम असल्याचे सांगून खासगी स्वयंसेवी संस्थेने जिल्हाभर अगरबत्ती प्रकल्प चालविला. या प्रकल्पात महिला मजुरांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक शोषण करण्यात आले. याबाबत तक्रारी होऊनही वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकाराकडे दुर्लक्ष केले. येंकाबंडा येथील मजुरांनी मागील सहा महिन्यांपासून आपल्या मोबदल्यासाठी संघर्षाची भूमिका घेतली होती. मंगळवारी आंदोलन केल्यामुळे वन विभागाला अखेर नमते घेत आठ दिवसात मोबदल्याचे पैसे वितरित केले जाईल, असे आश्वासन द्यावे लागले. यावेळी मजूर मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)
आठ दिवसात मिळणार मजुरांना रक्कम
By admin | Updated: September 2, 2015 01:10 IST