गडचिरोली : जिल्ह्यातील ग्रामीण भागात वीजचोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र, याकडे वीज वितरण कंपनीचे दुर्लक्ष होत असल्याने वीज महामंडळाचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. मात्र, वीजचोरीचा भुर्दंड इतर नागरिकांना सहन करावा लागत आहे. दुर्गम व ग्रामीण भागात कार्यक्रमांदरम्यान विजेच्या तारावर आकोडा टाकून वीजचोरी केली जात आहे.
नाल्यांचा उपसा नाही, डास वाढले
एटापल्ली : शहरातील बहुतांश वाॅर्डातील नाल्या कचरा व सांडपाण्याने तुडुंब भरल्या आहेत. ओपन स्पेसही कचऱ्याचे केंद्र बनले आहे. परिणामी, डास व कीटकांची उत्पत्ती होत आहे. आरोग्य धोक्यात आले आहे. नगरपरिषदेने फवारणी करून डास व कीटकांचा बंदोबस्त करण्याची मागणी आहे.
शासकीय दूध शीतकरण केंद्राचा अभाव
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात नागेपल्ली व कनेरी येथे राज्य शासनाचे दूध शीतकरण केंद्र आहे. मात्र, दुधाचे पुरेसे उत्पादन जिल्ह्यात नसल्याने सदर शीतकरण केंद्र सध्या बंद आहे. नव्या सरकारने दुग्ध व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न करून शीतकरण केंद्र सुरू करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
ग्रामीण भागातील स्मशानभूमींची दुरवस्था
कुरखेडा : जि.प. प्रशासनामार्फत दहन व दफनभूमी बांधण्याची योजना गेल्या काही वर्षांपासून हाती घेण्यात आली असली, तालुक्यातील घाटी, गांगुली, मालदुगी परिसरातील अनेक गावांतील जुन्या स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणचे दहनशेड मोडकळीस आले असून, स्मशानभूमीत जाण्यासाठी पक्का रस्ताही नाही.
मुलचेरात पाळीव डुकरांचा हैदोस वाढला
मुलचेरा : तालुका मुख्यालयी पाळीव डुकरांचा हैदोस निर्माण झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. मात्र, डुकरांचा बंदोबस्त करण्याकडे नगरपंचायतीचे दुर्लक्ष आहे. डुकरांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अनेक ठिकाणी डुकरांकडून घाणही निर्माण केली जात असल्याने नागरिक त्रस्त आहेत. सातत्याने मागणी करूनही प्रशासनाने स्वच्छतेबाबत माेहीम हाती घेतली नाही.
कव्हरेजअभावी माेबाइलधारक त्रस्त
अहेरी : आलापल्ली-सिरोंचा मुख्य मार्गावरील गोलाकर्जी गावात कव्हरेज नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. गोलाकर्जी रस्त्यावर असल्याने राजाराम, खांदला, पत्तीगाव, चिरेपल्ली, छल्लेवाडा, मरनेली आदी गावांतील नागरिकांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क होत नाही. टाॅवर व भूमिगत केबल लाइनवर लाखाे रुपये खर्च करूनही सेवेत सुधारणा झाली नाही.
झुडपी जंगल शेतीसाठी उपलब्ध करा
गडचिरोली : जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये झुडपी जंगल आहे. या जंगल शेतकऱ्यांना शेतजमिनीसाठी उपलब्ध करून दिल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल. वाढत्या लोकसंख्येबरोबरच जमिनीचे तुकडेही वाढत चालले आहेत. कमी जमिनीत यांत्रिकीकरण करणे शक्य होत नाही.
पोर्ला बस स्थानकावर गतिरोधकाची गरज
गडचिरोली : तालुक्यातील, तसेच गडचिरोली-आरमोरी मार्गावरील प्रमुख ठिकाण म्हणून पोर्ला गावाची ओळख आहे. येथे नेहमीच बस स्थानकावर नेहमीच प्रवाशांची गर्दी असते. येथून वाहनधारक भरधाव वेगात वाहने हाकत असतात. त्यामुळे येथे गतिरोधक उभारावे, अशी मागणी आहे.
जननी सुरक्षा योजनेचा लाभ मिळण्यास दिरंगाई
आलापल्ली : शासनाच्या वतीने जननी शिशू सुरक्षा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र, जिल्ह्याच्या दुर्गम भागात कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत शस्त्रक्रिया केल्यानंतरही दोन ते अडीच महिने संबंधित मातांना लाभ मिळत नाही. खमनचेरू प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर याबाबत प्रचंड दिरंगाई होत असल्याचे दिसून येते.
घाण पाण्याच्या गटाराने डास वाढले
गडचिरोली : स्थानिक नगरपालिका क्षेत्रात विविध वॉर्डात मोकळ्या भूखंडावरून घाण पाण्याचे डबके, तसेच गटारे निर्माण झाले आहेत. या गटाराच्या पाण्यात डासांची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती होत आहे. परिणामी, शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. जंतुनाशक फवारणी करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
खरपुंडी मार्गावर पथदिवे लावा
गडचिरोली : खरपुंडी मार्गावर डम्पिंग यार्डपर्यंत वीजतारा टाकून खांब गाडण्यात आले आहेत. मात्र, या मार्गावर अजूनपर्यंत पथदिवे लावण्यात आले नाही. सकाळी अनेक नागरिक फिरण्यासाठी खरपुंडी मार्गावर जातात. या मार्गावर पथदिवे लावण्याची मागणी आहे.
कोल्हापुरी बंधाऱ्यांची दुरुस्ती केव्हा होणार
गडचिरोली : सिंचाई विभागाच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यात नाल्यांवर शेकडो कोल्हापुरी बंधारे बांधण्यात आले आहेत. मात्र, मागील अनेक वर्षांपासून या बंधाऱ्यांची दुरुस्ती करण्यात आली नाही. अनेक बंधारे फुटले आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी साचून राहत नसल्याने सभोवतालचे शेतकरी अडचणीत आले आहेत. नदी, नाले, तलाव, बोड्या असूनही बंधारे योग्य नसल्याने व्यवस्था अपुरी आहे.
युवक गुंतले सट्टापट्टीच्या व्यवसायात
गडचिरोली : लॉकडाऊननंतर अनेकांच्या हातांना काम नसल्यामुळे बेरोजगारी वाढत आहे. त्यातून काही भागांत सट्टापट्टी सुरू आहे. अनेक युवक एजंट म्हणून सट्टापट्टीची वसुली करीत आहेत. पोलिसांचे त्याकडे दुर्लक्ष झाले असल्याचे दिसून येते. त्यामुळे सट्टापट्टीचे प्रमाण वाढत चालले आहे. अनेक विद्यार्थी व युवक या व्यवसायात गुंतले असल्याचे दिसून येत आहे.
मोडकळीस आलेल्या शाळांची दुरुस्ती करा
सिरोंचा : तालुक्यातील दुर्गम भागातील अनेक शाळांच्या इमारतींना ५० वर्षांपेक्षा अधिक कालावधी झाला आहे. या शाळांच्या इमारती जीर्णावस्थेत पोहोचल्या आहेत. या इमारतींचे निर्लेखन करून इमारत बांधण्याची मागणी आहे.
शहरातील पक्के अतिक्रमण कायमच
आलापल्ली : शहरातील चारही प्रमुख मार्गावरील अतिक्रमण काढण्याची कार्यवाही प्रशासनाकडून करण्यात आली. मात्र, या चारही मार्गांवर पक्क्या स्वरूपाचे अतिक्रमणही मोठ्या प्रमाणात आहे.
कृषिपंप अजूनही विजेच्या प्रतीक्षेत
देसाईगंज : शासनाच्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना विजेवर चालणारे मोटार पंप देण्यात आले. शेतकऱ्यांनी वीज जोडणीसाठी डिमांडची रक्कम भरली. मात्र, दोन वर्षांचा कालावधी उलटूनही वीज जोडणी मिळाली नाही.