गडचिरोली : बनावट कागदपत्रे तयार करून प्लॉटची विक्री करणार्या अमीन कमरूद्दीन जिवानी (४९) रा. गांधीवार्ड याच्याविरोधात गडचिरोली पोलीस स्टेशनमध्ये शनिवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमीन जिवानी याने इमरान सब्बाजअली लाखानी व रहीम सीराजभाई दोढीया रा. बसेरा कॉलनी गडचिरोली यांना भूमापन क्रमांक १२४/१ ब मधील क्रमांक ८ चा प्लॉट अकृषक असल्याची माहिती दिली. जिवानी याने सदर प्लॉटचा सातबारा दाखविला. त्याचबरोबर अकृषक असल्याचे प्रमाणपत्रदेखील दाखविले. एवढेच नाही तर याबद्दल एका वृत्तपत्रात जाहीर सूचना प्रकाशित केली. यावर विश्वास ठेवत इमरान लाखानी व रहीम दोढीया यांनी सदर प्लॉट १८ एप्रिल २०१३ रोजी ५ लाख रूपयात विकत घेतला. अर्जदारांनी राजस्व विभागाकडील अभिलेखावर नाव चढविण्याकरिता अर्ज केला असता, सदर प्लॉट अजुनही कृषक असून जिल्हाधिकार्यांनी अकृषक असल्याचा कोणताही आदेश दिला नसल्याचे लक्षात आले. याबाबतची तक्रार इमरान लाखानी व दोढीया यांनी शुक्रवारी गडचिरोली पोलीस स्टेशनमध्ये केली. पोलिसांनी कागदपत्रांची शहनिशा केल्यानंतर अमीन जिवानी याच्या विरोधात शनिवारी ४२० कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. लाखानी यांनी तक्रार दाखल केली असल्याची भनक लागताच अमीन जिवानी फरार झाला. वृत्त लिहिपर्यंत पोलिसांनी जीवानी याला अटक केली नव्हती. यामुळे खळबळ माजली आहे. (नगर प्रतिनिधी)
अमीन जिवानीवर गुन्हा दाखल
By admin | Updated: May 11, 2014 00:18 IST