बैठक : जिल्हाधिकाऱ्यांकडून पूर्वतयारीचा आढावागडचिरोली : स्थानिक पिकासह कृषी तंत्रज्ञान आणि संलग्न व्यवसायाची माहिती शेतकऱ्यांना मिळावी या हेतूने आत्माच्या वतीने कृषी महोत्सवाचे आयोजन मार्च महिन्यात केले जाणार आहे. या महोत्सवाच्या पूर्व तयारीचा आढावा जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांनी बुधवारी आत्मा कार्यालयाच्या समिती कक्षात घेतला. शेतकऱ्यांना या महोत्सवातून उद्योग संधी मिळेल, यासाठी प्रयत्न करा, अशा सूचना जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांनी दिल्या. बैठकीला आत्माचे प्रकाश पवार, आत्माच्या प्रीती हिरळकर, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर उपस्थित होते. कृषी महोत्सवासंदर्भात शासनाने सूचना निर्गमित केल्या आहेत. त्यानुसार आयोजन होत असले तरी स्थानिक शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन त्यांना उपयोगी पडेल अशा स्वरूपाची माहिती द्यावी, असे जिल्हाधिकारी नायक म्हणाले. तसेच महोत्सवात शेतकऱ्यांना उपलब्ध होणाऱ्या किफायतशील यंत्रांची माहिती शेतकऱ्यांना व्हावी, याचे नियोजन करावे, विदर्भ उद्योग संघटना आणि इतर संघटनांना निवडक वेळ देऊन सादरीकरणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कृषी आधारित उद्योगाच्या संधी व पूरक व्यवसायाची माहिती देण्यावर भर द्यावा. महोत्सवाची प्रसिद्धी करण्याकरिता मराठीसह गोंडी, माडिया, तेलगू, बंगाली, उर्दू, छत्तीसगडी भाषेचाही वापर करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी नायक यांनी दिल्या. (शहर प्रतिनिधी)
मार्चमध्ये होणार कृषी महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2017 01:22 IST