लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नवीन तालुके व स्वतंत्र अहेरी जिल्हा निर्मितीची मागणी वाढत चालली आहे. तालुक्याची निर्मिती न केल्यास मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला जात असल्याने राजकीय पक्षांचे धाबे दणाणले आहेत.धानोरा तालुक्यात पेंढरी, चामोर्शी तालुक्यात घोट व आष्टी, अहेरी तालुक्यात कमलापूर, जिमलगट्टा या गावांना तालुक्याचा दर्जा देण्याची मागणी आहे. ज्या तालुक्यांचे विभाजन करण्याची मागणी होत आहे, ते तालुके विस्ताराने फार मोठे आहेत. तालुका मुख्यालयापासून शेवटच्या गावांचे अंतर १०० किमीच्या जवळपास आहे. दुर्गम भागातून तालुकास्थळी येण्यासाठी वाहतुकीची साधने सुध्दा उपलब्ध नाहीत. त्यामुळे अनेक नागरिक योजनांपासून वंचित आहेत.लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्व पक्षीय नेते व कार्यकर्ते एकत्र येऊन नवीन तालुका निर्मितीची मागणी करीत आहेत. आठ दिवसांपूर्वी पेंढरी येथे आंदोलन झाले. घोट येथेही पत्रकार परिषद घेऊन तालुक्याची निर्मिती न झाल्यास मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. इतरही ठिकाणी तालुका निर्मितीचे आंदोलन पुढे रेटण्याच्या दृष्टीने नियोजन सुरू आहे. मतदानावर बहिष्काराचा इशारा दिल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे. नागरिकांना शांत करण्याचा प्रयत्न राजकीय व्यक्तींकडून होत आहे.
निवडणुकीच्या तोंडावर तालुके निर्मितीसाठी आंदोलने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 11:38 IST
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नवीन तालुके व स्वतंत्र अहेरी जिल्हा निर्मितीची मागणी वाढत चालली आहे.
निवडणुकीच्या तोंडावर तालुके निर्मितीसाठी आंदोलने
ठळक मुद्देराजकीय क्षेत्रात खळबळ मतदानावर बहिष्काराचा इशारा