पत्रकार परिषद : आदिवासी विद्यार्थी संघाचा इशारागडचिरोली : आदिवासी विकास विभागाच्या शासकीय वसतिगृहात राहणाऱ्या जवळपास १ हजार २०० वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रथम सेमिस्टरची परीक्षा दोन दिवसांवर असतांनाही अभ्यासक्रमाच्या पुस्तकांचे वितरण करण्यात आले नाही. वसतिगृहाच्या गृहपालांनी विद्यार्थ्यांना पुस्तके दिली नाहीत. यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. आश्रमशाळा व वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या मागण्यांच्या पुर्ततेसाठी प्रथम सेमिस्टरची परीक्षा आटोपल्यानंतर जिल्हाभरातील आश्रमशाळा व वसतिगृह बंद पाडू, असा इशारा आदिवासी विद्यार्थी संघाचे जिल्हाध्यक्ष क्रांती केरामी व पदाधिकाऱ्यांनी रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिला.दोन वर्षांपासून वसतिगृहातील आदिवासी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली नाही. तसेच गेल्या सत्रातील मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्याचे व यंदाच्या सत्रातील जुलै ते सप्टेंबर या महिन्याचा निर्वाहभत्ता विद्यार्थ्यांना मिळाला नाही. गणवेश मिळाले नाही, आश्रमशाळा व वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत, असेही क्रांती केरामी यावेळी म्हणाल्या. आश्रमशाळा, वसतिगृहांकडे प्रशासन व शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. पत्रकार परिषदेला प्रकाश मट्टामी, देवत्री टोहलिया, प्रवीण हलामी, दिशा पोरेटी, रविता नैताम, रघुनाथ हिचामी, महेंद्र पिदा उपस्थित होते. (प्रतिनिधी)
परीक्षेनंतर आश्रमशाळा, वसतिगृह बंद करू
By admin | Updated: October 26, 2015 01:28 IST