पत्रकार परिषद : सफाई मजदूर काँग्रेस कामगार संघटनेची मागणी लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : गडचिरोेली जिल्ह्याच्या दहा तालुका मुख्यालयाच्या ग्रामपंचायतीत सफाई कामगार म्हणून ४० ते ५० जणांनी काम केले. नगर पंचायत झाल्यावर आजही हे कामगार करीत आहेत. त्यामुळे शासनाने दहा नगर पंचायतीत जुन्या ४० ते ५० सफाई कामगारांना आधी सामावून घ्यावे, त्यानंतर रिक्त पदांवर सरळसेवा भरतीने नव्या उमेदवारांची भरती करावी, अशी मागणी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस कामगार संघटना जिल्हा गडचिरोलीच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत केली. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष छगन महातो यांनी सांगितले की, एक हजार लोकसंख्येमागे एक सफाई कामगार असावा, असे शासन निर्णयात नमूद आहे. आरमोरी नगर पंचायतीत सफाई कामगारांची एकूण २२ पदे मंजूर आहेत. यापैकी जुने ९ सफाई कामगार कार्यरत आहेत. आधी या जुन्या ९ सफाई कामगारांना नगर पंचायतीच्या सेवेत सामावून घ्यावे, त्यानंतर उर्वरित जागांवर सरळसेवेने उमेदवारांची नियुक्ती करावी, शैक्षणिक अर्हतेनुसार नगर पंचायतीच्या रिक्त जागेवर सफाई कामगारांना सामावून घ्यावे, असेही महातो यांनी सांगितले. यावेळी योगेश सोनवाने, तेजकुमार सोनेकर, रोहन मधुमडके, बबीता मोगरे, प्यारेलाल शेंदरे, चंदा सोनवाने हजर होते.
जुन्या सफाई कामगारांना सामावून घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 02:15 IST