२८२ आरोपींना अटक : १७ लाखांचा मुद्देमाल जप्त; पोलिसांचे दुर्लक्षगडचिरोली : शासनाने २६ आॅगस्ट १९९३ रोजी दारूबंदी केली. तेव्हापासून गडचिरोली जिल्ह्यात दारूविक्री हा गुन्हा ठरविला जातो. यांतर्गत गडचिरोली पोलिसांनी अवैद्य दारूविक्रेत्यांवर छापा टाकून २०१०-११ ते आॅक्टोबर २०१४ या कालावधीपर्यंत ९१० गुन्ह्यांची नोंद केली आहे. यामध्ये २८२ आरोपींना अटक करून १७.४ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. समाजसेवक डॉ. अभय बंग यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नानंतर गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी करण्यात आली. दारूबंदीची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी स्थानिक पोलीस व उत्पादन शुल्क विभागावर सोपविली. मात्र या दोन्ही विभागांच्या दुर्लक्षामुळे गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदीचे तिनतेरा वाजले आहे. दारू सुरू असलेल्या जिल्ह्यांमध्ये जेवढी दारू मिळत नाही, त्यापेक्षा अधिक दारू गडचिरोली जिल्ह्यात विकल्या जाते. दारू सुरू असलेल्या जिल्ह्यांमध्ये केवळ दारू दुकानातच दारू विकली जाते. मात्र या ठिकाणी प्रत्येक गल्लीबोळात अवैध दारूची दुकाने थाटण्यात आली आहेत व ही दुकाने पोलिसांच्या आशिर्वादाने राजरोसपणे सुरू आहेत. काही दुकानदारांनी तर बिअरबारलाही लाजवेल अशा सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या असून त्यासाठी आगावूचा चार्जही आकारला जात आहे. यामुळे दारूविक्रेते गब्बर होत चालले असले तरी अनेकांचे कुटुंब उघड्यावर पडले आहेत. त्यामुळे दारू बंदीवर प्रश्नचिन्हही उपस्थित केले जात आहेत. गल्लीबोळात सुरू असलेल्या दारू दुकानांमुळे त्रस्त झालेल्या काही गावातील महिलांनी एकत्र येत गावात दारूबंदीचा ठराव घेतला आहे. गावात दारूविक्री करीत असल्याचे आढळून आल्यानंतर सदर महिला पोलीस स्टेशनला फोन करून याबाबतची माहिती देतात. गावकऱ्यांच्या दबावाखातर पोलीस संबंधित दारूविक्रेत्याला पोलीस स्टेशनमध्ये नेतात. मात्र त्याच्यावर योग्य कलमा लावल्या जात नसल्याने एका दिवसातच त्याची सुटका होते. एवढेच नाही तर पोलीस दारूविक्रेत्याला एखाद्या व्हीआयपी व्यक्तीप्रमाणे वागणूक देत असल्याने दारूविक्रेत्यांची हिंमत वाढतच चालली असल्याचे दिसून येत आहे. मागील पाच वर्षांत ९१० दारूचे गुन्हे घडले आहेत. या पाच वर्षांत सुमारे २८२ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर त्यांच्याकडून सुमारे १७.०४ रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या गुन्ह्यांवरून गडचिरोली जिल्ह्यातील दारूविक्रीची व्याप्ती लक्षात येते. (नगर प्रतिनिधी)
बंदीच्या जिल्ह्यात दारूचे ९०० गुन्हे
By admin | Updated: January 29, 2015 23:05 IST