गडचिरोली : जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने जिल्ह्यात १८ जानेवारीला पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार असून, ८८ हजार ३०४ बालकांना पोलिओचा डोज पाजण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कमलेश भंडारी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.डॉ. भंडारी यांनी सांगितले की, पल्स पोलिओ मोहिमेचा पहिला टप्पा १८ जानेवारीला राबविण्यात येणार असून, शून्य ते पाच वर्षे वयोगटातील ८८ हजार ३०४ बालकांना पोलिओचा डोज देण्यात येणार आहे. त्यात ग्रामीण भागातील ८१ हजार १६९ तर शहरी भागातील सात हजार १३५ बालकांचा समावेश असणार आहे. एकूण दोन हजार ३०४ केंद्रांवरून ही मोहीम राबविण्यात येणार आहे. मोहीम राबविण्यासाठी आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आरोग्य सहायक, औषध निर्माता, परिचारिका आदींची मदत घेतली जाणार आहे. मोहिमेकरिता ९७ मोबाईल टीमची व्यवस्था करण्यात आली आहे. १८ जानेवारीची मोहीम संपल्यानंतर शहरी भागात १९ ते २३ जानेवारीपर्यंत, तर ग्रामीण भागात २० ते २२ जानेवारीपर्यंत घरोघरी जाऊन पल्स पोलिओ लसीकरण केले जाणार आहे. नागरिकांनी जवळच्या केदं्रावर जाऊन पाच वर्षांपर्यंतच्या आपल्या बाळाला पल्स पोलिओचा डोज द्यावा, असे आवाहन डॉ. भंडारी यांनी केले. २०१२ पासून देशात पोलिओचा एकही रुग्ण आढळून आला नाही. २०१४ मध्ये गडचिरोली जिल्हयात १२ संशयित पोलिओ रुग्ण शोधण्यात आले. मात्र त्यापैकी एकही पोलिओ रुग्ण आढळला नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेला डब्लूएचओचे कन्सल्टंट डॉ. मोहम्मद साजिद, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर, युनिसेफचे कन्सल्टंट शंकर चिकनकर, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. किशोर वाघ उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)
८८,३०४ बालकांना पाजणार पोलिओ डोज
By admin | Updated: January 15, 2015 22:50 IST