गडचिराेली : आदिवासी विकास विभागाच्या भामरागड प्रकल्प कार्यालयातंर्गत लाहेरी येथील शासकीय आश्रमशाळेतील ६० विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याने या विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्याचा प्रकार २८ जानेवारी राेजी बुधवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास उजेडात आला. दरम्यान या घटनेने आदिवासी विकास विभागात खळबळ उडाली आहे. दरम्यान भामरागडचे प्रकल्प अधिकारी अमर राऊत हे सकाळपासूनच लाहेरीत ठाण मांडून आहेत.
२७ जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास जेवण केल्यानंतर या शासकीय आश्रमशाळेतील एका विद्यार्थ्याला पोटदुखीचा त्रास झाला होता. २८ जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास एका मागून एक अशा जवळपास ६० विद्यार्थ्यांना असाच त्रास होऊ लागल्याने येथील कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना लाहेरीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांत उपचारासाठी दाखल केले. ४२ विद्यार्थ्यांची प्रकृती जास्त बिघडल्याने त्यांना भामरागड येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. या सर्व विद्यार्थ्यांना उलटी, मळमळ आणि पोटदुखीचा त्रास होत असल्याने अन्नातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज भामरागड येथील डाॅक्टरांनी व्यक्त केला. दाेन विद्यार्थ्यांना अधिक वेदना हाेत असल्याने त्यांना अहेरीच्या महिला व बाल रूग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती आहे.
सदर घटनेची माहिती मिळताच भामरागडचे प्रकल्प अधिकारी अमर राऊत, तहसीलदार किशोर बागडे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी रोशन चव्हाण यांनी आश्रमशाळेला भेट घेऊन वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या चमुला बोलावून उर्वरित विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी सुरू केली.
३०० विद्यार्थी घेतात शिक्षण
लाहेरी येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेत पहिली ते बारावीचे मिळून एकूण ३०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. दरम्यान यापैकी ६० विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याने त्यांच्यावर औषधाेपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे या आश्रमशाळेत शिक्षण घेणारे सर्व विद्यार्थी दुर्गम व अतिदुर्गम भागातील आहेत.
"लाहेरीच्या शासकीय आश्रमशाळेतील जवळपास ६० विद्यार्थ्यांना सकाळी ११ वाजतापासून पाेटदुखी, उलटी व मळमळ असा त्रास सुरू झाल्याने लागलीच आराेग्य चमुमार्फत संबंधित सर्व विद्यार्थ्यांची तपासणी व औषधाेपचार सुरू करण्यात आला. मुलांची याेग्य काळजी घेत असून परिस्थितीवर आमचे पुर्ण लक्ष आहे. सदर घटनेची याेग्यरित्या चाैकशी करण्यात येईल."
- अमर राऊत, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, भामरागड.
Web Summary : Sixty students at a Gadchiroli Ashram school suffered food poisoning after dinner. Students experienced stomach pain, vomiting, and nausea. Most were hospitalized; two are in serious condition. Officials are investigating, ensuring student care.
Web Summary : गढ़चिरौली के एक आश्रम स्कूल में रात के खाने के बाद साठ छात्रों को भोजन विषाक्तता हो गई। छात्रों को पेट दर्द, उल्टी और मतली का अनुभव हुआ। अधिकांश को अस्पताल में भर्ती कराया गया; दो की हालत गंभीर है। अधिकारी जांच कर रहे हैं, छात्रों की देखभाल सुनिश्चित की जा रही है।