गडचिरोली : रबी हंगामासाठी गडचिरोली जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकांनी ८९९ शेतकऱ्यांना सहा कोटी ४५ लाख रूपयांच्या कर्जाचे वितरण करण्यात आले आहे. खरीप हंगामाबरोबरच बहुतांश शेतकरी रबी पिकांचेही उत्पादन घेतात. यावर्षी जवळपास ५० हजार हेक्टरवर रबी पिकांची लागवड करण्याच्या उद्देशाने कृषी विभागाने नियोजन केले होते. त्याचबरोबर आरमोरी, देसाईगंज या तालुक्यांमध्ये इटीयाडोह तलावाचे पाणी येत असल्याने या तालुक्यांमध्ये उन्हाळी धानपिकाचेही उत्पादन घेतले जाते. याशिवाय रबी हंगामामध्ये सूर्यफूल, सोयाबीन, गहू, हरभरा, तूर, लाखोळी, पोपट, उळीद, मूग आदी पिकांचेही उत्पादन घेतले जाते. धानपीक निघण्यापूर्वीच रबी पिकांची लागवड करण्यात येते. या कालावधीत बहुतांश शेतकऱ्यांकडे पैसाच राहत नाही. त्यामुळे बँकांकडून कर्ज घेतल्याशिवाय पर्याय शिल्लक राहत नाही. सावकाराच्या तुलनेत बँका अत्यंत कमी दराने कर्जाचा पुरवठा करतात. त्यामुळे शेतकरीही बँकेकडूनच कर्ज घेण्यास पसंती दर्शवितात. गडचिरोली जिल्ह्यात राष्ट्रीयकृत ६१ व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ५० अशा एकूण १११ शाखा आहेत. चालू वर्षी प्रतिएकरी १२ हजार रूपये कर्ज देण्याची मर्यादा ठरविण्यात आली होती. त्याचबरोबर सर्वच बँकांना मिळून १४ कोटी ८७ लाख रूपयांचे कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी फक्त राष्ट्रीयकृत बँकांनी ६ कोटी ४५ लाख रूपयांचे कर्ज वितरण केले आहे. या कर्जावर सहा टक्के व्याजदर आकारला जातो. मात्र ही सर्व रक्कम काही कालावधीनंतर शासनाकडून बँकांना मिळत असल्याने सदर रक्कम नंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाते. गडचिरोली जिल्ह्यातील ९० टक्के नागरिक शेती हाच व्यवसाय करतात. बहुतांश शेतकरी आता आधुनिक पद्धतीने शेती करण्याचा प्रयत्न करीत आहे. यासाठी येणारा खर्च कर्ज घेऊन भागविल्याशिवाय पर्याय राहत नाही. त्यामुळे शेतकरी बँकांकडे कर्जाची मागणी करतात. मात्र गडचिरोली जिल्ह्याच्या विस्ताराच्या तुलनेत बँकांची संख्या अत्यंत कमी आहे. १० ते २० किमी अंतर पार करून बँकेमध्ये जावे लागते. त्याचबरोबर अनेक शेतकऱ्यांना बँक सवलतीच्या दरात कर्ज देते, हे सुद्धा माहित नाही. त्यामुळे अनेक शेतकरी कर्जाच्या सुविधेपासून वंचित आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांना सावकाराकडून कर्ज घेतल्याशिवाय पर्याय राहत नाही. सावकार बँकांच्या तुलनेत दोन ते तीनपटीने अधिक व्याजदराची आकारणी करून शेतकऱ्यांची लूट करीत आहेत. या प्रकाराला आळा घालण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात बँकांचे जाळे निर्माण होणे गरजेचे आहे. (नगर प्रतिनिधी)
रबीसाठी सहा कोटींचे कर्ज
By admin | Updated: January 24, 2015 22:54 IST