आलापल्ली : अहेरी तालुक्यातील आलापल्ली ग्रामपंचायतीची नागरिकांकडे ५३ लाख ५४ हजार ६८८ रूपयाच्या गृहकराची थकबाकी आहे. अपेक्षीत वसुली न झाल्यामुळे गामपंचायत प्रशासनाला विकास कामे करण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे. आलापल्ली ग्रामपंचायतीचे नागरिकांवर एकूण ३१ लाख २३ हजार ६ रूपये गृहकर थकीत आहे. यामध्ये १८ लाख २५ हजार ९५२ रूपयाची थकबाकी जुनी असून १२ लाख ९७ हजार रूपये चालू वर्षातील थकबाकी आहे. वीज करापोटी १ लाख ९१ हजार ४०५ जुनी थकबाकी तर ७६ हजार ९८० रूपये चालू वर्षातील थकीत आहे. सामान्य पाणी कराचे ३६ लाख ५ हजार ७६३ जुनी व चालू वर्षातील २० लाख ५ हजार ४५० असे एकूण ५ लाख ७१ हजार २१३ रूपये बाकी आहे. आरोग्य कराचे १ लाख २८ हजार ५११ जुनी व चालू वर्षातील ४८ हजार ९०९ असे एकूण १ लाख ७७ हजार ५०१ रूपये थकीत आहे. खास पाणी कराचे एकूण ११ लाख ७४ हजार ५८३ रूपये नागरिकांवर थकीत आहे. कर वसुलीबाबत तोडगा न काढल्यामुळे ग्रा.पं. प्रशासनाविरोधात नागरिकांमध्ये रोष निर्माण होत आहे. या संदर्भात माहिती देताना ग्राम विकास अधिकारी व्ही. पी. वेलादी म्हणाले की, अनेक वर्षांपासून गृहकर थकीत आहे. गावातील नागरिक गृहकर देण्यास टाळाटाळ करीत आहेत. थकबाकी असलेल्या नागरिकांच्या विरोधात ग्रा.पं. प्रशासन धडक मोहीम राबविणार असून गृहकराचा भरना न केल्यास अशा नागरिकांवर मालमत्ता जप्तीची कारवाई करू. (वार्ताहर)
आलापल्लीकरांवर ५३ लाखांची थकबाकी
By admin | Updated: February 7, 2015 00:47 IST