तीन ग्रामपंचायती अपात्र : ६५ हून गावांतील शौचालयांचे काम ९० टक्क्यांवर पोहोचले गडचिरोली : स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमांतर्गत गडचिरोली जिल्ह्यात जिल्हा परिषद प्रशासनामार्फत वैयक्तिक शौचालय बांधण्याचा जंबो कार्यक्रम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. याच अभियानांतर्गत संबंधित गावात ९० टक्क्यापेक्षा अधिक शौचालयांचे बांधकाम पूर्ण करणाऱ्या सन २०१५-१६ या वर्षातील तब्बल ४८ ग्रामपंचायतींना हागणदारीमुक्त घोषीत करण्यात आले आहे. जि.प. प्रशासनाच्या वतीने या ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवकांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमात गौरविण्यात आले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शौचालय उभारणीवर प्रचंड भर दिला आहे. स्वच्छ भारत मिशन अभियान महाराष्ट्रासह संपूर्ण देशात सुरू करून शौचालय बांधण्याच्या कामाला वेग दिला आहे. शौचालय बांधकामाचा नियमित आढावा प्रशासनाकडून शासन घेत आहे. स्वच्छ भारत मिशन जि.प. गडचिरोली अंतर्गत सन २०१६-१७ या वर्षात जिल्ह्याला एकूण ३४ हजार २४९ वैयक्तिक शौचालय उभारण्याचे उद्दिष्ट दिले आहे. सदर ३४ हजार २४९ शौचालय गडचिरोली जिल्ह्यातील ५८ ग्रामपंचायतीच्या गावात बांधावयाचे आहेत. सदर शौचालयाचे काम पूर्ण करण्याची मुदत ३१ मार्च २०१७ पर्यंत असून या विहीत वेळेत अधिकाधिक शौचालयाचे बांधकाम पूर्ण करण्याच्या हालचाली प्रशासनाने सुरू केल्या आहे. गडचिरोली जिल्ह्यात आतापर्यंत १२ हजार वर शौचालयाचे बांधकाम पूर्ण झाले असल्याची माहिती आहे. वैयक्तिक शौचालय बांधकामाचा जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनू गोयल वेळोवेळी आढावा घेत आहे. (स्थानिक प्रतिनिधी) आॅगस्टमध्ये झाली होती तपासणी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालयाचे बांधकाम पूर्ण करून जिल्हा परिषदेमार्फत शासनाकडे गोदरीमुक्तीसाठी ५१ ग्रामपंचायतींनी प्रस्ताव सादर केला. या ५१ ग्रामपंचायतीतील गावांची गोंदिया व यवतमाळ येथील राज्यस्तरीय चमूने आॅगस्ट महिन्यात तपासणी केली. यापैकी तीन ग्रामपंचायतींना अपात्र ठरविण्यात आले असून ४८ ग्रामपंचायतींना गोदरीमुक्त घोषीत करण्यात आले आहे. सन २०१५-१६ या वर्षाच्या वार्षिक कृती आराखड्यातील या ग्रामपंचायती आहेत. गोदरीमुक्त झालेल्या ग्रामपंचायती सन २०१५-१६ या वर्षात ४८ ग्रामपंचायती गोदरीमुक्त घोषीत करण्यात आल्या आहेत. यामध्ये वेलगूर, वैरागड, कोजबी, जोगीसाखरा, ठाणेगाव, आरेवाडा, धिरंगी, सोनापूर, वसंतपूर, आष्टी, दुर्गापूर, कारवाफा, जांभळी, गुरूपल्ली, देवापूर, मुरखळा, मुडझा, चुरचुरा, सावेला, वाकडी, वसा, जमगाव, येवली, विहिरगाव, खेडेगाव, आंधळी (नवरगाव), खरकाडा, घाटी, कढोली, रानवाही, शिवणी, चिरचाडी, मालदुगी, सातपुती, बोदलदंड, नांगपूर, मल्लेरा, सुंकरअल्ली, विठ्ठलरावपेठा, आमगाव, कोरेगाव, कोकडी, शंकरपूर, तुळशी, बोडधा, सावंगी, शिवराजपूर व विहिरीगाव आदी ग्रामपंचायतीचा समावेश आहे.
४८ ग्रामपंचायती हागणदारीमुक्त
By admin | Updated: December 25, 2016 01:33 IST