एटापल्ली : स्थानिक पंचायत समितीच्या वतीने सन २०१४-१५ या वर्षात आदिवासी उपयोजनेंतर्गत ७० शेतकरी लाभार्थ्यांना बैलजोडी, बैलगाडी व स्प्रेपंप मंजूर करण्यात आले. तर ३३ लाभार्थी शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर बैलजोडी व आॅईल इंजिन मंजूर करण्यात आले. या सर्व लाभार्थ्यांना पंचायत समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बैलगाड्याचे वितरण करण्यात आले.यावेळी पंचायत समितीचे सभापती दीपक फुलसंगे, उपसभापती संजय चरडुके यांच्या हस्ते लाभार्थी शेतकऱ्यांना बैलगाड्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी पंचायत समिती कृषी अधिकारी एस. एल. बोरावार, कृषी विस्तार अधिकारी गायकवाड, दुधे आदी उपस्थित होते. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून आदिवासी उपयोजनेंतर्गत १०० टक्के अनुदानावर ५० हजार रूपयापर्यंतचे बैलगाड्या व बैलजोड्या वितरणाची योजना राबविली जात आहे. एटापल्ली पंचायत समितीमार्फत या योजनेची जनजागृती सुरू असून या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन अधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे. एटापल्ली तालुक्यातील दुर्गम व अतिदुर्गम गावातील नागरिकांनी पंचायत समिती व लोकप्रतिनिधींशी संपर्क साधून शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, जेणेकरून आर्थिक प्रगती साधून कृषी क्रांती होईल, असे आवाहन पं. स. सभापती दीपक कुलसंगे यांनी कार्यक्रमात केले. याप्रसंगी लाभार्थी शेतकरी व त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
३३ लाभार्थ्यांना बैलजोडीचे वाटप
By admin | Updated: March 26, 2015 01:24 IST