लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आदिवासी शेतकऱ्यांना विहीर व इतर शेती उपयोगी साहित्यांचा लाभ देण्यासाठी शासनाने बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना सुरू केली असून या योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात सुमारे ३२५ विहिरी मंजूर करण्यात आल्या आहेत.बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेंतर्गत आदिवासी शेतकऱ्यांना विहीर व इतर शेती उपयोगी साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने सुमारे ८ कोटी ७० लाख रूपये मंजूर केले आहेत. यातील क्षेत्रांतर्गतच्या शेतकऱ्यांसाठी ८ कोटी २१ लाख व क्षेत्राबाहेरील आदिवासी शेतकऱ्यांसाठी ४९ लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्याला विहीर बांधकामासाठी २.५० लाख, इनवेल बोअरसाठी २० हजार, वीज जोडणी आकारासाठी १० हजार, तुषार सिंचनसाठी २५ हजार, ठिबक सिंचनसाठी ५० हजार व जुनी विहीर दुरूस्तीसाठी ५० हजार रूपये अनुदान उपलब्ध करून देण्यात येते. या योजनांचा लाभ घेण्यासाठी शासनाने सुरूवातीला जात वैधता प्रमाणपत्राची सक्ती केली होती. अनेक शेतकऱ्यांकडे जात वैधता प्रमाणपत्र नसल्याने त्यांनी अर्ज केला नाही. त्यामुळे अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित राहण्याचा धोका निर्माण झाला होता. ही बाब शासानाच्या लक्षात आल्यानंतर शासनाने जात वैधता प्रमाणपत्राची सक्ती मागे घेतली व अर्ज करण्यास मुदतवाढ दिली.२२ जानेवारीला अर्जांची छाननी करून लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. आर्थिक वर्ष संपण्याच्या पूर्वी विहिरींचे बांधकाम पूर्ण करण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने कामाला गती देत सुमारे २०० लाभार्थी शेतकऱ्यांना विहीर बांधकामाचे आदेश दिले आहेत. त्यापैकी ५० विहिरींच्या खोदकामाला सुरूवात झाली आहे. विहीर बांधकामामुळे शेतकºयांना सिंचनाची सुविधा उपलब्ध होणार आहे.अनुसूचित जातीसाठी २ कोटींचा निधीअनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांना विहीर व इतर शेतीउपयोगी साहित्याचा लाभ देण्यासाठी शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना सुरू केली आहे. या योजनेसाठी शासनाने जिल्हा परिषदेला सुमारे २ कोटी १० लाख रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीतून ६९ विहिरी मंजूर केल्या आहेत. त्यापैकी ५० विहीर लाभार्थ्यांना कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. पैकी ८ विहिरींच्या कामाला सुरूवात झाली आहे. या योजनेंतर्गत गडचिरोली तालुक्यात १३, आरमोरी १६, देसाईगंज ८, कुरखेडा ५, कोरची २, धानोरा २, चामोर्शी ८, मुलचेरा २, अहेरी ९, एटापल्ली २, भामरागड १, सिरोंचा तालुक्यात ११ विहिरी मंजूर करण्यात आल्या आहेत.