दिलीप दहेलकर ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : स्वत:च्या गावात शाळा नसल्याने पाच किमीपर्यंतची पायपीट करून शिक्षण घेणाºया इयत्ता आठवी ते बारावीतील विद्यार्थिनींसाठी मानव विकास मिशनअंतर्गत मोफत सायकली वितरणाची योजना राबविली जात आहे. या योजनेंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांनी दीडशेवर शाळांमधील ३ हजार २४६ विद्यार्थिनींना सायकली उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावास निधीसह मंजुरी प्रदान केली आहे. त्यामुळे आता सावित्रीच्या लेकींचा शिक्षणासाठीचा प्रवास सुकर होणार आहे.सन २०१९-२० या चालू शैक्षणिक सत्रात येत्या दोन महिन्यात मंजूर झालेल्या सर्व सायकली विद्यार्थिनींना उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाने पुढाकार घेतला असून त्या अनुषंगाने युध्दपातळीवर कार्यवाही सुरू आहे. माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने गतवर्षीच्या उन्हाळ्यात इयत्ता नववी, दहावी व बारावीत शिक्षण घेत असलेल्या व शाळेच्या गावी ये-जा करणाऱ्या विद्यार्थिंना सायकल देण्यासाठीचे प्रस्ताव शाळास्तरावरून मागविले. प्राप्त प्रस्तावाची पडताळणी करून मंजुरीच्या कार्यवाहीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय अधिनस्त मानव विकास मिशनच्या कार्यालयात सादर केले.यामध्ये १०० वर शाळांच्या विद्यार्थिनींच्या प्रस्तावाच समावेश होता. त्यानंतर जुलै, आॅगस्ट महिन्यात इयत्ता आठवी व अकरावीत असलेल्या विद्यार्थिनींना सायकली देण्याबाबतचा दुसरा प्रस्ताव तयार करण्यात आला. हा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आला. त्यानंतर जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड, माध्यमिक शिक्षणाधिकारी आर. पी. निकम यांनी प्रस्तावासंदर्भात पाठपुरावा केला.जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या पुढाकाराने मानव विकास मिशनच्या नियोजन अधिकाऱ्यांनी कार्यवाही करून निधीची तरतूद केली. पहिल्या प्रस्तावातील २ हजार २३१ विद्यार्थिनींच्या सायकलीसाठी एकूण ७८ लाख ८ हजार ५०० रुपयांच्या प्रस्तावास प्रशासकीय मंजुरी दिली. यापैकी २ हजार २३१ सायकलीसाठी अग्रिम स्वरूपात प्रती सायकल दोन हजार रुपये प्रमाणे ४४ लाख ६२ हजार रुपयांचा निधी जिल्हा परिषदेकडे वळता केला. शिक्षण विभागाच्या वतीने कार्यवाही करून हा निधी संबंधित शाळांच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यात वळता करण्यात आला. शाळांच्या वतीने काही विद्यार्थिनींच्या खात्यात दोन हजार रुपयांची रक्कम जमा करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.दुसºया टप्प्यातील १ हजार १५ सायकलींसाठी प्रती सायकल ३ हजार ५०० रुपये प्रमाणे ३५ लाख ५२ हजार ५०० रुपयाच्या प्रस्तावास जिल्हाधिकारी कार्यालयाने मंजुरी प्रदान केली आहे. सदर ३५ लाख रुपयाचा निधी जिल्हा परिषदेकडे वर्ग झाला असून हा निधी शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यात जमा करण्यासाठीची कार्यवाही हाती घेण्यात आली आहे.दोन सत्रानंतर विद्यार्थिनींना मिळणार सायकलीशाळा व माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने सायकलीबाबतचा प्रस्ताव व नियोजन आराखडा तयार करून जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्यात आला. मात्र जिल्हा प्रशासनाकडून निधीसह प्रस्तावाला मान्यता न मिळाल्याने विद्यार्थिनींना सायकलचा लाभ देता आला नाही. सन २०१७-१८ व २०१८-१९ या शैक्षणिक सत्रात पाच किमीपर्यंतची पायपीट करणाऱ्या विद्यार्थिनींना सायकली मिळाल्या नाहीत. मात्र आता दोन्ही प्रस्तावास मंजुरी मिळाली असून निधी प्राप्त झाल्याने यंदाच्या शैक्षणिक सत्रात सावित्रीच्या लेकींच्या हाती नवीन सायकल दिसणार आहे.बस सुविधा नसलेल्या मार्गावर सोयमानव विकास मिशन अंतर्गत राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यात विद्यार्थिनींसाठी मोफत प्रवासाची सुविधा करण्यात आली असून जिल्हाभरात अनेक बसगाड्या धावत आहेत. ज्या ठिकाणी बसगाड्या नाही, अशा मार्गावरील विद्यार्थिनींसाठी सायकलीचा लाभ दिला जातो.
३२४६ लेकींना मिळणार सायकली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 06:00 IST
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या पुढाकाराने मानव विकास मिशनच्या नियोजन अधिकाऱ्यांनी कार्यवाही करून निधीची तरतूद केली. पहिल्या प्रस्तावातील २ हजार २३१ विद्यार्थिनींच्या सायकलीसाठी एकूण ७८ लाख ८ हजार ५०० रुपयांच्या प्रस्तावास प्रशासकीय मंजुरी दिली. यापैकी २ हजार २३१ सायकलीसाठी अग्रिम स्वरूपात प्रती सायकल दोन हजार रुपये प्रमाणे ४४ लाख ६२ हजार रुपयांचा निधी जिल्हा परिषदेकडे वळता केला.
३२४६ लेकींना मिळणार सायकली
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी : शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यात अग्रिम रक्कम वळती