गडचिरोली : जिल्ह्याच्या सीमेपासून २५ किलोमीटर अंतरावरील छत्तीसगडच्या अबुझमाड येथे बुधवार, २१ मे राेजी सकाळी पाेलिस- नक्षल चकमक उडाली. यात २७ नक्षलवादी ठार झाले, तर एक पाेलीस जवान शहीद झाला. विशेष म्हणजे, या चकमकीत १ कोटीचे बक्षीस असलेला माओवादी बसवा राजू यालाही पाेलिसांनी कंठस्नान घातल्याची माहिती आहे.
छत्तीसगड राज्यातील दंतेवाडा, नारायणपूर आणि बिजापूर जिल्ह्याच्या सीमेवरील (ट्राय जंक्शन) अबुझमाडच्या जंगलात विविध राज्यातून नक्षलवादी मोठ्या संख्येने एकत्र आले होते. विविध राज्यात पाच कोटीहून अधिक बक्षीस असलेला नक्षलवादी संघटनेचा सरचिटणीस व ‘पॉलिट ब्युरो’ सदस्य बसवा राजू याचादेखील यात समावेश असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणेला मिळाली. त्यानंतर या पारिसरात २० मे रोजी रात्रीच्या सुमारास दंतेवाडा, बिजापूर, नारायणपूर आणि कोंडागाव जिल्ह्यातील ५०० हून अधिक ‘डीआरजी’ व इतर सुरक्षा जवानांनी नक्षलविरोधी अभियान राबविले. २१ मे रोजी सकाळी पाेलिसांकडून अभियान राबविले जात असताना नक्षलवाद्यांनी जवानांच्या दिशेने जोरदार गोळीबार केला. प्रत्युत्तरात सुरक्षा जवानांनी केलेल्या गोळीबारात २७ नक्षलवादी ठार झाले, तर एक पाेलिस जवान शहीद झाला. घटनास्थळावरून पाेलिसांनी माेठ्या प्रमाणावर साहित्य व हत्यारे जप्त केली आहेत. चकमकीत नक्षल नेता बसवा राजूचा खात्मा झाल्याची माहिती आहे.
आठवडाभरापूर्वी ३१ नक्षल्यांचा खात्मा
तेलंगणा आणि छत्तीसगड सीमेवरील करेगुट्टा टेकडीवर आठवडाभरापूर्वी सुरक्षा यंत्रणेणे नक्षलवाद्यांविरोधात सर्वात मोठे अभियान राबवले होते. २३ दिवस चाललेल्या या चकमकीत ३१ नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले होते. कुख्यात नक्षल कमांडर माडवी हिडमा नेतृत्व करीत असलेल्या सर्वात आक्रमक बटालियन क्रमांक १ चे जवळपास ७०० हून अधिक नक्षलवादी छत्तीसगड-तेलंगणा सीमवेरील करेगुट्टा टेकडीवर एकत्र आल्याची माहिती सुरक्षा यंत्रणेला मिळाली होती. यावरून केंद्र आणि राज्य सुरक्षा दलातील १० हजारहून अधिक जवानांनी ‘ऑपरेशन संकल्प’या नावाने माेहीम राबविली हाेती.