आसरअल्ली : पातागुडम नदीघाटावर १०० च्या संख्येने वनतस्कर सागवान लाकडाचे तराफे लावून इंद्रावती नदीतून सागवानाची वाहतूक करीत आहे, अशी गुप्त महिंती १५ जानेवारी रोजी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. या माहितीच्या आधारे आसरअल्ली वनपरिक्षेत्राचे वनाधिकारी डी. एम. भार्गवे यांच्या नेतृत्वात ४० वनकर्मचाऱ्यांचे पथक या भागात पोहोचले. वनतस्करांकडून सागवान घेण्याचा प्रयत्न करीत असताना वनतस्करांनी वनकर्मचाऱ्यांच्या दिशेने दगडांनी हल्ला सुरू केला. तस्करांना पांगविण्यासाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी आपल्या पिस्तोलमधून हवेत चार राऊंड फायर केले. त्यानंतर अंधाराचा फायदा घेऊन छत्तीसगड राज्याच्या सीमेत तस्कर पळून गेले. त्यानंतर वनकर्मचारी व मजूर १८१ सागवान लाकड जप्त करून पातागुडम नदी किनाऱ्यावरून महाराष्ट्राच्या सीमेत गोळा केले. जप्त करण्यात आलेली लाकडे ४० घनमीटर असून त्याची बाजारात किंमत २५ लाख रूपये असल्याची माहिती आसरअल्ली वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. तस्कर पळून जात असताना छत्तीसगडी भाषेत वनाधिकाऱ्यांना शिविगाळ करीत होते. यापूर्वी दोन दिवसांआधी १० लाख रूपये किमतीचे ७६ सागवान लठ्ठे जप्त करण्यात आले. या कारवाईत जी. व्ही. एस. राजू, व्ही. बी. राजुरकर, कोठारे यांच्यासह कर्मचारी सहभागी होते. (वार्ताहर)
२५ लाखांचे सागवान जप्त
By admin | Updated: January 17, 2015 01:34 IST