गडचिरोली : राज्यभरात गाजत असलेल्या शिष्यवृत्ती घोटाळ्यात गडचिरोली जिल्ह्यात पोलीस प्रशासनाने २३ संस्थांची विविध बँक खाते गोठविली आहे, अशी माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे. एकट्या गडचिरोली आदिवासी विकास प्रकल्पात १७ कोटी रूपयांचा घोटाळा उजेडात आला असून पोलीस प्रशासनाने आता अहेरी व भामरागड एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाकडेही तपासाचे रडार फिरविले आहे. गडचिरोली आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत आठ शिक्षण संस्थांवर पोलिसांनी सध्या कारवाई केलेली आहे. तसेच २३ संस्थांचे बँक खातेही गोठविण्यात आले आहे. ज्ञानदीप बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे सचिन मंदे, मनोज चिंचोलकर, साईराम बहुउद्देशीय ग्रामीण विकास संस्था सावलीचे चंद्रकांत बाबुराव कुनघाडकर, गुरूनंदन महिला कल्याणकारी मंडळाचे ऋषीदेव धुरके, अर्जुन ग्रामीण विकास संस्थेचे प्रशांत सेलोकर, दुर्गा वाघरे, याशिवाय संकल्पसिध्दी बहुउद्देशीय संस्थेचे अमित बंदे, रोहित बोम्मावार, सुरज बोम्मावार यांच्यासह अनेकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. काही आरोपी पोलीस तर काही आरोपी न्यायालयीन कोठडीत आहे. तर काहींना उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामिन मिळाला असल्याची सुत्रांची माहिती आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
२३ संस्थांचे बँक खाते सील
By admin | Updated: February 13, 2015 01:39 IST