गडचिरोली : जिल्ह्यात १२ पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाचे मिळून ग्रामसेवकांची एकूण ४३७ पदे मंजूर आहेत. यापैकी ४१९ पदे भरण्यात आली असून सद्यस्थितीत ग्रामसेवकांची १८ पदे रिक्त असल्याची माहिती मिळाली आहे. रिक्त असलेल्या ग्रामसेवकांच्या १८ पदांमध्ये गडचिरोली पंचायत समिती अंतर्गत २, चामोर्शी पंचायत समिती अंतर्गत ५, मुलचेरा पंचायत समिती अंतर्गत २, अहेरी पंचायत समिती अंतर्गत ५, भामरागड पंचायत समिती अंतर्गत १ व सिरोंचा पंचायत समिती अंतर्गत ग्रामसेवकांची ३ पदे रिक्त आहेत. प्रशासनाने कुरखेडा पंचायत समिती अंतर्गत १, चामोर्शी पंचायत समिती अंतर्गत १ व सिरोंचा पंचायत समिती अंतर्गत १ असे एकूण ३ ग्रामसेवकांना निलंबित करण्यात आले आहेत. ग्रामसेवकांची रिक्त पदे असलेल्या अहेरी पंचायत समिती अंतर्गत ५ ग्रामपंचायती पेसा कायद्यांतर्गत मोडतात, यामध्ये दामरंचा, मांड्रा, देचली, रेपनपल्ली, राजाराम आदींचा समावेश आहे. भामरागड पंचायत समितीमधील इरकडूमे या पेसा अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवकांचे पद रिक्त आहे. सिरोंचा पंचायत समिती अंतर्गत कोर्लामाल, गर्कापेठा, गोलागुडम आदी ग्रामपंचायतीचा समावेश आहे. चामोर्शी पंचायत समिती अंतर्गत ग्रामसेवकांचे पद रिक्त असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये बहादूरपूर, वाघोली, वालसरा, जामगिरी, मार्र्कंडा (कं.) आदी सर्वसाधारण ग्रामपंचायतीचा समावेश आहे. गडचिरोली पंचायत समिती अंतर्गत गिलगाव व वाकडी या ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवकांचे पद रिक्त आहे. मुलचेरा पंचायत समिती अंतर्गत कोठारी व शांतिग्राम या दोन ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवकांचे पद रिक्त आहे. ग्रामसेवकांची रिक्त पदे तत्काळ भरण्यात यावी, अशी मागणी त्या-त्या गावातील नागरिकांनी प्रशासनाकडे अनेकदा केली. मात्र विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे ग्रामसेवकांचे रिक्त पदे प्रशासनास भरता आले नाही. आता ही पदे भरण्यास मार्ग मोकळा झाला आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
जिल्ह्यात ग्रामसेवकांची १८ पदे रिक्त
By admin | Updated: October 20, 2014 23:11 IST